Last Updated: Wednesday, June 27, 2012, 13:13
www.24taas.com, मुंबई पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. पाणीकपाती संदर्भात आज होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.. मुंबईत १ जुलैपासून पाणीकपातीचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान हिच स्थिती पुणे आणि नाशिकमध्ये आहे. त्यामुळे पाण्याचे गहिरे संकट दिसून येत आहे.
पालिकेचा दहा टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव आहे. शिवाय अप्पर वैतरणाच्या राखीव साठ्यातून पाणी घेतलं जाणार आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचं महापौर सुनील प्रभू यांनी सांगितलं.
पुणेकरांवरचं पाणीसंकट तीव्र झालंय. सात जुलैपर्यंत पाऊस पडला नाही तर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात अजून सरासरीइतकाही पाऊस झालेला नाही. सध्या धरणांमध्ये 35 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी ४५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा होता. त्यामुळे पुणेकरांना पाणी अतिशय जपून वापरावं लागणार आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात केवळ ५९८ दशलक्षघनफूट साठा शिल्लक आहे. त्यामुळे एक वेळ पाणीकपात करत सध्या नाशिककरांना वेठीला धरलं गेल आहे. सध्याचा पाणी साठा महिनाभर पुरू शकतो असा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.
महापालिकेच्या व्यवस्थेत मात्र सध्याच्या पातळीनंतर पाणी उचलण्याची क्षमताच नाहीये. खोलवर क्षमता तयार करून तातडीने काम केल्यास पाणीकपात करण्याचीही गरज पडणार नाहीये.
First Published: Wednesday, June 27, 2012, 13:13