पोलिसांना भटकळ बंधू हवेत जिंदा या मुर्दा - Marathi News 24taas.com

पोलिसांना भटकळ बंधू हवेत जिंदा या मुर्दा


झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
१३ जुलै रोजीच्या मुंबईतील बॉम्बस्फोटाचे धागेदोरे अद्यापि हाती न लागल्याने अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले दहशतवादविरोधी पथक बरखास्त करण्याची मागणी पुढे आली आहे. परंतु दहशतवादविरोधी पथक बरखास्त करून काहीच साध्य होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. जोपर्यंत रियाज भटकळ व त्याचा भाऊ इक्बाल हे दोघे जिंदा या मुर्दा सापडत नाहीत तोपर्यंत मुंबईसह देशभरातील बॉम्बस्फोट मालिका थांबणे कठीण असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
 
रियाज व त्याचा भाऊ इक्बाल हे कुर्ला (पश्‍चिम) फितवाला कंपाऊंडमध्ये राहत होते. परंतु आता त्या ठिकाणी त्यांचे कुणीही नातेवाईक राहत नाहीत. कर्नाटकातील भटकळ गावी फक्त त्यांचे आईवडील राहतात. हे दोघेही भाऊ सध्या कराचीत राहत असून तेथूनच ते भारतात बॉम्बस्फोट घडवून आणीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जोपर्यंत भटकळ बंधू एटीएस किंवा क्राइम ब्रँचच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत अधूनमधून बॉम्बचे फटाके उडतच राहणार आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
 
पाकिस्तानची आयएसआय ही संघटना भटकळ बंधूंचा मुंबईत घातपाती कारवाया करण्यासाठी वापर करून घेत आहे. या दोन बंधूंनी मुंबईसह देशभरात आपले हस्तक तयार केले असून त्यांना अर्थसहाय्यही हे दोघे भाऊच करतात. मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना जिहादसाठी तयार करतात आणि घातपाती कारवायांच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवितात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुन्हा भारतात पाठवितात. इंडियन मुजाहिदीन ही अतिरेकी संघटना रियाज भटकळने स्थापन केली आहे.
 
रियाज भटकळ हा कुर्ल्याचा पूर्वीचा एक खंडणी वसूल करणार चिल्लर गुंड होता. त्याने मुंबईतील बर्‍याच शूटआऊटमध्ये भाग ही घेतला होता. परंतु मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी मागे लागताच त्याने मुंबई सोडली आणि तो पाकिस्तानचा हस्तक झाला. आज तो कराचीत पाकिस्तानच्या आश्रयाला आहे. तो व दाऊद इब्राहिम जोपर्यंत मुंबई पोलिसांच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत मुंबईतील घातपाती कारवाया थांबणार नाहीत, असे आज ठामपणे सांगितले जात आहे.
 
रियाज व इक्बाल भटकळ या दोन भावांनी या देशभरातील पोलीस यंत्रणांना जेरीस आणले आहे. बॉम्बस्फोट घडविणारा एक गट पकडला गेला की हे बंधू दुसरा गट तयार करतात आणि बॉम्बस्फोट घडवितात. मुंबईतील २००३ च्या मुलुंड येथील रेल्वे बॉम्बस्फोटानंतर भटकळ बंधूंचे नाव प्रथम पुढे आले. त्यानंतर मुंबई, दिल्ली, वाराणसी, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत भटकळ बंधूंचीच नावे पुढे येत असून हे दोघे जिंदा या मुर्दा सापडल्याशिवाय पोलिसांना शांतता लाभणार नाही, असे सांगण्यात येत आहे.
 
 

First Published: Sunday, October 2, 2011, 12:31


comments powered by Disqus