Last Updated: Tuesday, July 3, 2012, 10:57
www.24taas.com, मुंबई मध्य रेल्वेच्या उपनगरी स्थानकांमध्ये प्लास्टिकच्या वेष्टनात खाद्यपदार्थ विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय स्टॉलधारकांच्या दबावापुढे बासनात गुंडाळावा लागला. केवळ चाळीस दिवसांसाठी बंदी दिसून आली. समाजसेविका मेधा पाटकर यांच्या अडेल भूमिकेमुळे आणि स्टॉलधारकांचा दबाव यामुळे पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यांमुळे पाणी तुंबण्यास मदत होणार आहे.
मेधा पाटकर आणि मधू कोटियन यांच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भूमिकेमुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्लास्टिकबंदीचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले आणि ही बंदी त्वरित उठविण्यात आली आहे. रेल्वेच्या हद्दीतील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरी रेल्वेच्या हद्दीमध्ये प्लास्टिकच्या वेष्टनातील खाद्यपदार्थ विकण्यास बंदी घातली होती. २१ मेपासून ही बंदी अमलात आणली होती.
मेधा पाटकर, मधू कोटियन, ‘नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेन्ट’ या संघटनेचे प्रतिनिधी तसेच मध्य रेल्वेवरील स्टॉलधारकांचे काही प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांची भेट घेऊन ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणी केली. फलाटांवर खानपान सेवा देणाऱ्या कंत्राटदारांशी रेल्वे प्रशासनाने बंदी घालण्यापूर्वी चर्चा केली नाही, खाद्य पदार्थाच्या उत्पादकांशी पर्यावणप्रेमी वेष्टनांची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत कोणतीही चर्चा केली नाही. त्याचप्रमाणे ही बंदी टप्प्याटप्प्याने लागू केली नसल्याचे मेधा पाटकर यांनी महाव्यवस्थापकांना सांगितले.
मध्य रेल्वेच्या उपनगरी हद्दीमध्ये प्लास्टिकबंदी करण्याचा निर्णय हा सर्वस्वी आमचा असून उपनगरी स्थानके आणि रेल्वे मार्गावरील कचरा कमी करण्याच्या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली होती. यामुळे काही दिवसांत कचरा साठण्याचे प्रमाण कमी झाले होतेच; पण रेल्वेच्या हद्दीतील पाणी तुंबण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे महाव्यवस्थापक जैन यांनी सांगितले.
पावसाळ्यात कचऱ्यामुळे नाले तुंबतात आणि रेल्वे सेवा कोलमडते, हा अनुभव लक्षात घेऊन नाले तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली तर आमचे काय चुकले? प्रवाशांनाच नको असेल तर बंदी उठवतो. रेल्वे चालवणे आमचे महत्त्वाचे काम आहे, अशी भूमिका मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी मांडली.
बंदीचा उपयोग काय? - मेधा पाटकरबंदी उठविण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. अर्धवट घेतलेला निर्णय काय कामाचा, अशा शब्दांमध्ये मेधा पाटकर यांनी प्लास्टिकबंदी उठविण्याचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, केवळ उपनगरी रेल्वे स्थानकांवर बंदी घालून काही उपयोग झालेला नाही. रेल्वेच्या हद्दीमध्ये स्वच्छता राखण्यासाठी महापालिका कोटय़वधी रुपये देत आहे. असे असताना केवळ या प्लास्टिकच्या वेष्टनातील पदार्थावर अर्धवट बंदी घालून काय उपयोग आहे. मेन लाइनवर कचरा जमा होत आहे. तो काय केवळ प्लास्टिकचाच आहे काय? , असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
First Published: Tuesday, July 3, 2012, 10:57