‘मुलगी चोर’ सीसीटीव्हीत कैद - Marathi News 24taas.com

‘मुलगी चोर’ सीसीटीव्हीत कैद

www.24taas.com, मुंबई 
 
ही बातमी आहे एका चोरीची... ही चोरी म्हणजे दागिने किंवा पैशांची नव्हे... तर ही चोरी आहे चक्क एका लहानग्या मुलीची... महत्त्वाचं म्हणजे हा मुलगी चोर सीसीटीव्हीत कैद झाल्यानं पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागलाय.
 
ही घटना आहे महिना भरापूर्वीची... 10 जूनची... रात्रीचा एक वाजलेला... गाडीची वाट पहात सीएसटी प्लॅटफॉर्मवर प्रवासी निपचीत झोपलेले... त्यातच चोर पावलानं येत एका चोरानं ३ वर्षांच्या लहान मुलीला अलगद उचललं. आई-वडिलांचे काही क्षणासाठी कदाचीत डोळे लवले असतील, तेवढ्यात ते डोळू चुकवून मुलीला कडेवर घेऊन चोरानं पोबारा केला... केवळ 40 सेकंदाचा हा घटनाक्रम... ही सर्व दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
 
एका मजुराची ही मुलगी असल्याचं पोलीसांच्या तपासात पुढे आलंय. एक महिना होऊनही मुलीचा ठावठिकाणा अजूनपर्यंत लागलेला नाही.... कॅमेऱ्यात कैद या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. एका पायानं लंगडत चालणाऱ्या या चोरानं लहान मुलीची चोरी करून प्लॅटफॉर्मच्या एका बाजूनं तो निघून गेला. सीएसटी स्टेशनवरील दहशतवादी हल्ल्याला काही काळ लोटत नाही तोच इथली सुरक्षा व्यवस्था पुन्हा किती ढिली आहे, हेच या घटनेनंतर पुढे येतंय. पोलिसांनी या प्रकरणी आता चार ते पाच टीम्स तयार केल्या असून विविध स्टेशन्सवर तपास सुरू केला आहे.
 
 

First Published: Friday, July 6, 2012, 15:49


comments powered by Disqus