पवार काका-पुतणे तटकरेंचे पाठीराखे! - Marathi News 24taas.com

पवार काका-पुतणे तटकरेंचे पाठीराखे!


www.24taas.com, मुंबई

 
राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर होणा-या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तटकरेंची पाठराखण केली आहे.
 
सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांच्या कंपन्यांच्या नावे रायगड जिल्ह्यात 7 हजार पाचशे एकर जमीन खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. याच आरोपांचा धागा पकडून भाजपचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या यांनी तटकरेंवर 25 हजार कोटींचा जमीनघोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
 
यासंबंधीची तक्रार यांनी कार्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडे केलीय.... कुटुंबीयांच्या नावे असलेल्या 193 कंपन्यांमार्फत जमीन खरेदी केल्याचा आरोप तटकरेंवर झालाय.... भाजपनं आज राज्यपाल के. शंकरनारायणन यांची भेट घेऊन तटकरेंवर कारवाईची मागणी केली. अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
 
दुसरीकडे पवारांनी तटकरेंची पाठराखण केलीय.... काही लोकांना मीडियासमोर अव्वाच्या सव्वा आरोप करायची सवय असते, त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं असं सांगत पवार काका-पुतण्यांनी तटकरेंना पाठिशी घातलंय.

First Published: Friday, July 6, 2012, 20:12


comments powered by Disqus