कोकणातील लोक दादागिरीला कंटाळले – राज - Marathi News 24taas.com

कोकणातील लोक दादागिरीला कंटाळले – राज

झी २४ तास वेब टीम, मुंबई
कोकणातील लोक दादागिरीला कंटाळले आहेत. त्यांना दहशत नकोय, तसेच कोकणात काम होत नाही, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्योग मंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांना लगावला आहे.
खेड नगरपालिकेवर मनसेचा झेंडा रोवल्यानंतर खेडचे नगरसेवक राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी हा टोला लगावला. त्याबरोबर त्यांनी मनसेच्या नगरसेवकांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी अनेक विषयांवर आपली रोखठोक मतेही मांडली.
अण्णांच्या आंदोलनाचा परिणाम नाही
नगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक विषय महत्त्वाचे असतात. त्यावेळी कोणते विषय महत्त्वाचे आहे त्यानुसार मतदान केले जाते. म्हणून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीत झाला नसल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. अण्णा हजारे यांनी पहिल्यांदा जे आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी भ्रष्टाचार, महागाई आणि स्थानिक मुद्दे या संदर्भात लोकांना आपल्या भावनांना वाट करून द्यायची होती, त्यामुळे ते रस्त्यावर उतरले होते. परंतु, आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाचा काही परिणाम झाल्याचे दिसत नाही.
 
मावळ आंदोलन संशयास्पद
मावळ आंदोलनानंतर तेथील जनतेने राष्ट्रवादीला सत्ता दिली. तसेच आता कळते आहे की, ज्या व्यक्तीला गोळी लागली ती पोलिसांच्या बंदुकीतून निघाली नव्हती. त्यामुळे हे आंदोलन होते की घडवले गेले होते. याबद्दल शंकाच आहे. पोलिसांनी गोळीबार केला, त्यामुळे गृहखातं हे राष्ट्रवादीकडं आहे, त्यांनीच योग्य तपास करावा.
महाराष्ट्रात सुरक्षेचा प्रश्न गंभीर
एका भय्याला पिस्तुलांसह पकडलं ही बातमी खूप धक्कादायक आहे. मी यापूर्वीपासून ओरडून सांगतो आहे की, विमानतळावर जसे सेक्युरिटी चेक होतं तसं रेल्वे स्टेशनवर का होतं नाही. आज एक जण सापडला. असे अनेक जण मुंबई-महाराष्ट्रात येत असतील, कोण, कुठला येतोय. कुणाचा कुणाला थांग पत्ता नाही.

First Published: Tuesday, December 13, 2011, 16:52


comments powered by Disqus