सीएसटी स्थानकात हार्बर रेल्वे रोखल्या - Marathi News 24taas.com

सीएसटी स्थानकात हार्बर रेल्वे रोखल्या

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
गेल्या एका आठवडय़ापासून हार्बर गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने संतप्त प्रवाशांनी रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात (सीएसटी) उपनगरी गाडय़ा रोखून धरल्याने गोंधळ निर्माण झाला.
 
त्रस्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी हार्बरच्या उपनगरी गाडय़ा रोखून धरल्या. या प्रकारामुळे केवळ हार्बरबरोबर मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे वेळापत्रकही कोलमडल्याने चाचा फटका घरी परतणाऱ्यांना बसला. हार्बर मार्गावर सातत्याने गाड्यांना विलंब होत असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संपला.
 
संतप्त प्रवासी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातच रूळांवर उतरले आणि त्यांनी पनवेल आणि अंधेरीला जाणाऱ्या दोन उपनगरी हार्बर गाडय़ा रोखून धरल्या. या घटनेची खबर कळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली आणि संतप्त प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र प्रवासी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी थोडा बळाचा करून प्रवाशांना मागे सारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पनवेलला जाणारी गाडी सोडण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातूनच गाडय़ा सोडण्यात येत नसल्याने टर्मिनसकडे येणाऱ्या गाडय़ा मस्जिद येथे थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे गाड्या उशिराने धावत होत्या.

First Published: Wednesday, December 14, 2011, 03:15


comments powered by Disqus