राणीच्या बागेतला ‘पांढरा राजा’ हरपला... - Marathi News 24taas.com

राणीच्या बागेतला ‘पांढरा राजा’ हरपला...

www.24taas.com, मुंबई
 
वीर जिजामाता उद्यानातील एकुलती एक पांढऱ्या मोरांची जोडी एकमेकांपासून विलग झालीय. इथल्या पांढऱ्या मोराचा मंगळवारी दुपारी मृत्यू झालाय.
 
गेल्या १५ वर्षांपासून जिजामाता उद्यानात हा पांढरा मोर बच्चेकंपनीला आनंद देत होता. बघायलाही दुर्मिळ असणाऱ्या या ‘पांढऱ्या’ आश्चर्याला पाहून तर मोठ्यांनाही लहान झाल्यासारखं वाटायचं आणि त्याला पाहायला तेही धडपडायचे. एकुलता एक असल्यामुळं हा पांढरा मोर या उद्यानाचा राजाच झाला होता. जिजामाता उद्यानात या पांढऱ्या मोराला साथ द्यायची ती पांढरी लांडोर... ती आता एकटी पडलीय. हा मोर गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होता. त्याला पक्षघाताचा झटका आला होता. २० वर्षांचा असल्याने त्याची प्रकृती अधिकच खालावली होती. त्याच्यावर उपचारही सुरू होते. मात्र काल दुपारी त्याचा मृत्यू झाला. या मोराचे शवविच्छेदन केले असता त्याच्या यकृत आणि मूत्रपिंडात दोष असल्याचे आढळून आले.
 
या मोराच्या मृत्यूने जिजामाता उद्यानातील प्रत्येक जण हळहळत होता. मृत्यूनंतर संध्याकाळी त्याला राणीच्या बागेतच पुरण्यात आलं. आता ‘पांढऱ्या राणी’ला सोबत करतायत उद्यानातील दोन रंगीत लांडोर.
 

First Published: Wednesday, July 11, 2012, 12:27


comments powered by Disqus