Last Updated: Thursday, December 15, 2011, 05:41
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबई महानगर पालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी युद्ध पातळीवर प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यामध्ये जोरदार स्पर्धा आहे ती एकमेकांचे हाडवैरी समजल्या जाणा-या शिवसेना आणि मनसेत.महिला आरक्षणामुळे महिला आणि तरूणींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हे पक्ष करतायत आणि आता तर या दोन्ही पक्षांमध्ये भावोजी वॉर रंगण्याची शक्यता आता दिसायला लागलीय.
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यामुळे महानगर पालिकेच्या निवडणुकांत महिलांना आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी पक्षांमध्ये चुरस वाढतेय. महिलांना आकर्षित करण्यासाठीच मनसेनं मुंबईतील मराठी भाग म्हणून समजल्या जाणा-या लालबागमध्ये खेळ खेळूया मनसे या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.यात दोन हजारंपेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता. खुद्द शर्मिला ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या अशा प्रकारच्या इव्हेंट्स चा उपयोग महिला मतांची मोळी बांधायला होत असल्याचं खुद्द मनसेनंच मान्य केलंय .
विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधण्याची जबाबदारी चॉकलेट हिरोची इमेज असणा-या स्वप्नील जोशीनं पार पाडली. शिवसेनेचे सरचिटणीस आदेश बांदेकरांच्या भावोजी इमेजचा फायदा शिवसेना करून घेणारंच. त्यामुळे दुस-या बाजुला या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला आणि तरूणींमध्ये चॉकलेट हिरोची इमेज असणा-या स्वप्निल जोशीला नव्या भावोजींच्या रूपात उतरवून मनसेनं हम भी कुछ कम नही हे दाखवुन दिलं. हाच प्रश्न जेव्हा मनसेचे भावेजी स्वप्नील जोशीला विचारला तेव्हा त्यानं अर्थातच सारावासारव केली.
राजकारणात मतं मिळवण्यासाठी अनेक युक्त्या लढवावव्या लागतात. खेळ खेळुया मनसे हा महिला मतदारांना आकर्षित करण्याचा एक भाग आहे. मात्र शिवसेनेच्या आदेश भावोजींसमोर मनसेनं स्वप्निल भावोजींना उतरवणं ही येणा-या मनपा निवडणुकीत रंगणा-या भावोजी वॉरची नांदीच म्हणावी लागेल.
First Published: Thursday, December 15, 2011, 05:41