Last Updated: Wednesday, July 18, 2012, 12:11
लोकचळवळींचे माहेरघर गोरेगाव - मृणाल गोरे
www.24taas.com, मुंबई लग्न होऊन गोरेगावात आले तेव्हा इथे तर बाबुराव सामंतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी विचारधारेचं बीज आधीच रुजलं होतं. सामंत आणि बंडू गोरे एकमेकांचे चांगलेच मित्र. त्यामुळे त्यांच्याबरोबर लगेचच इथल्या राजकारणात माझा प्रवेश झाला. तेव्हा गोरेगावचीलोकवस्ती जेमतेम वीस- पंचवीस हजाराची होती आणि त्याचा समावेश अजून मुंबई महानगरात व्हायचाच होता. अवतीभोवती झपाट्याने वाढत चाललेल्या शहराच्या गर्दीत गोरेगावसारख्या उपनगराने आपलं गावपण अजून जपून ठेवलंय याचं कौतुक करायला हवं. पण मला वाटतं गोरेगावच्या विस्ताराच्या जोडीने इथल्या विकासासाठी वेळोवेळी जे लढे झाले, ज्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळी उभ्या राहिल्या त्यांचा वाटा गोरेगावने जपलेल्या या वैशिष्ट्यांमध्ये मोठा आहे.
गोरेगावच्या बदलाची मी साक्षीदार आहे, एवढंच नाही तर त्यात प्रत्यक्ष सहभागीही राहिले आहे. लग्नापूर्वी खारमध्ये राहत असतानाच तिथल्या सेवा दलाच्या शाखांमध्ये मी जाऊ लागले होते. लग्न होऊन गोरेगावात आले तेव्हा इथे तर बाबुराव सामंतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी विचारधारेचं बीज आधीच रुजलं होतं. सामंत आणि बंडू गोरे एकमेकांचे चांगलेच मित्र. त्यामुळे त्यांच्याबरोबर लगेचच इथल्या राजकारणात माझा प्रवेश झाला. तेव्हा गोरेगावची लोकवस्ती जेमतेम वीस- पंचवीस हजाराची होती आणि त्याचा समावेश अजून मुंबई महानगरात व्हायचाच होता. पण हे उपनगर शहराला अगदी लागून, जवळजवळ वेशीपाशीच असल्याने शहरीकरणाचं लोण झपाट्याने येत होतं. तरीही त्या वाढत्या शहराचा सगळा कारभार अजूनही ग्रामपंचायतीच्या हातात होता. शाळा जिल्हा परिषदेची होती, दवाखानाही जिल्हा परिषदेचाच. सरपंच पुन्हा बाबुराव सामंतच होते. त्यांचं घर त्या भागातलं वजनदार प्रस्थ असल्याने त्यांचा गावावर वचक होता.

जुन्या गावांमध्ये पाटलाच्या घराचा असावा तसा. पण अशी महत्त्वाची व्यक्ती लोहियांच्या, जयप्रकाश नारायण वगैरेंच्या विचारांच्या प्रभावाखाली असल्याने या सरपंचपदाचा, ग्रामपंचायतीच्या अधिकारांचा अधिकाधिक वापर लोककल्याणासाठी कसा करता येईल याकडेच त्यांचा कटाक्ष असायचा. बाकी गाव म्हणावं तर प्रामुख्याने मध्यमवर्गीय वस्तीचं, पण आजच्यासारख्या उंच इमारती इथे नव्हत्या. त्याऐवजी खाजगी मालकीच्या छोटय़ा वाडय़ा होत्या. वाडय़ांमध्ये स्वतंत्र विहिरी असायच्या. पाण्याची सोय या विहिरींतूनच व्हायची. मुंबईचं पाणी शेजारी जोगेश्वरीपर्यंत पोहोचलं होतं पण इथे नाही. उरलेल्या ब-याच मोकळ्या जमिनी या खोतांच्या, त्यातही प्रामुख्याने मालाडच्या खोतांच्या होत्या आणि त्यावर बांधल्या गेलेल्या झोपडपट्टय़ांतून सगळा कष्टकरी समाज राहायचा. आजच्यासारख्या रस्त्यांच्या सोयीही नव्हत्या. पण या भागाच्या एकेका प्रश्नाला घेऊन जसजशी आंदोलनं होत गेली तसतसं लोकांपर्यंत एवढी माहिती नक्कीच पोहोचत गेली की हा मतदारसंघ काही तरी वेगळा आहे.
ग्रामपंचायतीवर निवडून आल्यावर माझ्या कामाला सुरुवात केली तेव्हा ते प्रामुख्याने महिलांशी संबंधित होतं. मला आठवतं, त्या महिला एक मूल हाताशी, एक मूल कडेवर अशा यायच्या. माझी एकच मुलगी बघून विचारायच्या, ‘असं का? आणखी मुलं झाली नाहीत?’ मी म्हणायचे, झाली नाहीत म्हणजे, आम्ही होऊ दिली नाहीत. त्यांना या गोष्टीचं नवल वाटायचं. कारण कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. तेव्हा मग मी माझी डॉक्टर बहीण कुमुद गुप्ते हिच्या मदतीने त्यासाठी शिबिरं घ्यायला सुरुवात केली. पार विरारपासून बायका या शिबिरांना यायच्या, कारण संपूर्ण उपनगर भागात अशा प्रकारची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. इथली शाळाही आमच्या घराजवळ होती. चौथीपर्यंतच होती. पण माझं तिथेही सतत येणं-जाणं असायचं त्यामुळे तिथल्या कामाला आपोआपच शिस्त राहत होती. या अशा सगळ्या कामांमुळे एक होत होतं की माझी ओळख गोरेगावातल्या घराघरांत होत होती. ती किती जवळिकीची बनली आहे त्याचा प्रत्यय गोरेगावला महानगरपालिकेचा भाग बनवण्यात यावं, ही मागणी आम्ही पूर्ण करून घेतली तेव्हा आला.
१९५७-५८ साली गोरेगाव ग्रामपंचायत महापालिकेत विलीन झाली. पहिल्याच निवडणुकीत कसलाही प्रचार न करता, माझी निवड लोकांनी महापालिकेवर करून दिली. या काळापर्यंत गोरेगावातली वस्ती सतत वाढत होती आणि त्यातून तयार होणारे नागरी सुविधांचे प्रश्न बिकट होत चालले होते. त्यातलाच ऐरणीवरचा प्रश्न अर्थातच पिण्याच्या पाण्याचा होता. कारण गर्दी वाढत होती तसतसा पाणीपुरवठ्यासाठी असणारा विहिरींचा पर्याय कालबाह्य होत चालला होता. पाणी अपुरं पडत होतं किंवा खराब होत होत. याचा त्रासही सर्वात जास्त महिलांनाच होत होता. महिलांच्या आरोग्याशीच जोडलेला स्वतंत्र शौचालयांचा प्रश्नही होताच. त्याला अजूनही हात लावला गेला नव्हता. महानगरपालिकेची पाइपलाइन जोगेश्वरीपर्यंत आली होती, मग गोरेगावपर्यंत पोहोचायला काहीच हरकत नव्हती. आंदोलनं करून, धरणी धरून, मोर्चे काढून ही पाइपलाइन आम्ही गोरेगावपर्यंत आणवली आणि इथला पाणीटंचाईचा मोठाच प्रश्न सुटला.

वाड्या आणि झोपडय़ा अशा दोन्ही वस्त्यांसाठी शौचालयांची सोय व्हायलाच हवी, हा प्रश्नही आम्ही लावून धरला. त्या काळात गोरेगावात आजच्यासारखी दळणवळणाची सोयही नव्हती. आणि नोकरीसाठी दूर मुख्य शहरात जाणा-यांची संख्याही खूप होती. मग त्यांच्यासाठी लोकल्स, इथे येणा-या बसेसची फ्रिक्वेन्सी आम्ही वाढवून घेतली. अगदी एक गोरेगाव लोकलही आम्ही सुरू करून घेतली होती. या प्रत्येक आंदोलनात इथला समाज नेहमी आमच्या बरोबरीने उभा राहिला, लढला हे गोरेगावचं वैशिष्ट्यच म्हणायला हवं. गोरेगावकरांमध्ये अशी लोकाभिमुख वृत्ती रुजण्यासाठी काय कारणं उपयोगी ठरली असतील याचा विचार करताना वाटतं की, या गावावर असणा-या समाजवादी विचारसरणीच्या प्रभावाचा त्यात मोठा वाटा होता. याच गटाने गोरेगावची सांस्कृतिक बाजूही समृद्ध केलीच आहे.
अगदी सुरुवातीच्या काळापासूनच गोरेगाव पश्चिमेचं अ. भि. गोरेगावकर हायस्कूल अशा सगळ्या कार्यक्रमांसाठी हक्काची जागा होती. पण त्याहूनही महत्त्वाची वास्तू म्हणजे इथला टोपीवाला बंगला. हा बंगला इथे उभारल्या गेलेल्या सगळ्या लोकचळवळींचा माझ्या सोबतीने साक्षीदार होता. आम्हा समाजवाद्यांचे कामांचे आराखडे, विचारमंथन, चर्चा-वाद सगळं काही होण्याचं मुख्य ठिकाण म्हणजे हाच बंगला होता. विशी-पंचविशीच्या आमच्यासारख्या मंडळींची बैठक तिथे दर बुधवारी व्हायची. त्यातूनच कामाची पुढची दिशा ठरायची. हा बंगला मूळचा र.गो. करमरकर यांचा. तेसुद्धा एक खासच व्यक्तिमत्त्व होतं. म्हशी पाळण्याचा धंदा त्यांनी निव्वळ हौस म्हणून सुरू केला होता. त्यांना राजकारणात रस होता आणि स्वातंत्र्यलढय़ात सहभागी होणा-यांना त्यांचा सतत पाठिंबा असायचा.
१९४२ च्या काळात बंडू गोरे भूमिगत झाले तेव्हा त्यांना लपण्यासाठी म्हणून या बंगल्याची जागा त्यांनी देऊ केली. आणि मग ते स्वत:च दुस-या जागी राहायला गेले आणि ही जागा आम्हाला मिळाली. त्या काळात लोकांच्या सभा घ्यायच्या ठरवल्या तरीही बंगल्यापुढच्या मोकळ्या जागेतच व्हायच्या. आमच्या सगळ्यांच्या कामाला विचारांचं जे भक्कम पाठबळ मिळत होतं ते या बंगल्यामध्ये दर बुधवारी झडणाऱ्या चर्चामधूनच आम्हाला मिळालं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आमच्या या सगळ्या धडपडीचं खुद्द राम मनोहर लोहियांनाही कौतुक होतं. लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन वगैरे मोठी मोठी मंडळी मुंबईत आली की टोपीवाला बंगल्यामध्ये जरूर उतरायची. त्यांच्या अशा प्रत्यक्ष येण्याचा परिणाम असा व्हायचा की आमच्या कामाबरोबरच या मंडळींच्या इथे येण्याचा एक दरारा बनला होता. शंभर वर्षे जुनी अशी ती इमारत पाडली गेली तेव्हा आम्ही सगळेच खूप हळहळलो इतक्या आठवणी त्या जागेशी जोडल्या गेल्या आहेत. पण त्याशिवाय पर्याय नव्हता. पण वास्तू नसली तरीही कामाच्या रूपात पुढेही चळवळ सुरूच राहिली हेही महत्त्वाचं म्हणायला हवं. त्यात कोणत्या कारणाने खंड पडला नाही.

बंडू गोरेंच्या जाण्यानंतर हे सगळं लवकर संपतंय की काय असं वाटलं होतं पण उलट त्यानंतर आम्ही राहिलेले सगळे अधिकच जवळ आलो. त्यांच्या नावाच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टसाठी बाबुराव सामंतांच्या पुढाकाराने पूर्वेला आरे रोड वर एका देवस्थानाची जागा आम्हाला मिळाली आणि आमच्या सामाजिक कामांसाठीचं ते केंद्र बनून गेलं. शहरातले मोठे मोठे डॉक्टर्स, पी. पी. कर्णिकांसारखे कान- नाक-घसा तज्ज्ञ वगैरे उपनगरातल्या माणसांना एरव्ही उपलब्ध होणं कठीण होतं. पण केशव गोरे स्मारकाच्या शिबिरांसाठी ते इथे यायचे. ही सोय पहिल्यांदाच इथल्या लोकांना मिळत होती. पुढे इथेच अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला तेव्हा ती संकल्पनासुद्धा अगदी नवी होती. इथल्या बायका मुलांना आवर्जून अभ्यासिकेत पाठवायच्या. तिथे गेलं की पास व्हायला होतं असं त्यांना वाटायचं. वास्तविक तेव्हाच्या छोटय़ा छोटय़ा घरांमध्ये गडबडीत अभ्यासासाठी पुरेशी शांतता मिळायची नाही ती या ठिकाणी मिळायची एवढंच कारण होतं. पुढच्या काळात नागरी निवारा परिषदेच्या वसाहतींसाठी केलेला लोकलढा आणि त्यातून उभी राहिलेली सहा हजार घरांची वसाहत हेही गोरेगावात झालेल्या लोकचळवळींचच एक आदर्श उदाहरण होतं. पण हळूहळू अशा लोकचळवळींमधला लोकांचा सहभाग कमी होत चालला आहे.
आमच्या गावाला सुविधा हव्यात, आपल्या भागाला शाळा हवी, आरोग्याच्या सोयी हव्यात, पाण्याची सोय हवी या सगळ्या मागण्या ज्या एकूण समाजाच्या वतीने मागितल्या जात होत्या त्या आता हे सगळं मला मिळायला हवं, एवढय़ाच मर्यादित हेतूने मागितलं जातंय. आमच्यासारखी समाजाचे प्रश्न घेऊन झगडणारी पुढची पिढी तयार करायला आम्हीही कमी पडलो हे मान्य करायलाच हवं. तरीही इतर शहरी भागांइतकं तुटलेपण गोरेगावात अजून जाणवत नाही. इथली माणसं, संस्था अजूनही एकमेकांशी आपुलकीने जोडलेल्या आहेत. एके काळी लोकचळवळींचं माहेरघर असल्याचा इतिहासच या आपलेपणाच्या मुळाशी असणार.
First Published: Wednesday, July 18, 2012, 12:11