Last Updated: Thursday, July 19, 2012, 12:00
www.24taas.com, मुंबई आज सकाळी दहा वाजल्यापासून चाहत्यांनी बांद्रा ते विलेपार्ले दरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूने फुलून गेला होता. आपल्या लाडक्या अभिनेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि अलविदा करण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या पार्थिवावर आज पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लाडक्या आनंदला अलविदा करण्यासाठी चाहत्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.
हिंदी सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार अभिनेते राजेश खन्ना यांचं काल मुंबईत निधन झालं. एप्रिल महिन्यापासून राजेश खन्ना मृत्यूशी झुंज देत होते.. राजेश खन्ना यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूडवर शोककळा पसरली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आशीर्वाद बंगल्यावर सेलिब्रिटी आणि चाहत्यांची रीघ लागली होती. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही आपल्या लाडक्या अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण केलीय. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही राजेश खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली.. दिल्लीतही अनेक अभिनेते आणि राजकारण्यांनी राजेश खन्ना यांच्या निधनाबाबत अतिव दु:ख व्यक्त केलय.

राजेश खन्ना. अनेक तरुणीच्या हृद्याचा सम्राट आणि बॉलीवुडचा सुपरस्टार दूरच्या प्रवासाला निघून गेलाय. आनंद चित्रपटात मृत्यूला वाकुल्या दाखवणाऱ्या या आनंद सहगलन आज फक्त बाबू मोशायलाच नव्हे तर करोडो फॅन्सना जगण्याचा निखालस आनंद वाटत चाहत्यांना अलविदा केलाय. गेले काही दिवस आजारी असणारा हा सुपरस्टार मृत्यूला वाकूल्या दाखवेल असं वाटलं होत. पण यावेळी मात्र मृत्यूला नाही फसवता आलं.
राजेश खन्ना... 'जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिये' असं म्हणणाऱ्या काकांनी आपलं आयुष्यही असंच जगलं. जाताना चाहत्यांच्या डोळ्यात मात्र ते अश्रू ठेवून गेले. शेकडो चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर शोककळा पसरली. आणि सगळ्यांनी राजेश यांच्या आशिर्वाद बंगल्याकडे धाव घेतली. जवळपास चार महिने मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या सासऱ्यांच्या निधनानं अभिनेता अक्षय कुमारही शोकाकूल झाला.
First Published: Thursday, July 19, 2012, 12:00