राज ठाकरेंच्या घरून उद्धवना जेवणाचा डबा - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंच्या घरून उद्धवना जेवणाचा डबा

www.24taas.com, मुंबई
 
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर बायपास किंवा अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी डॉक्टरांनी केलेल्या चर्चेनंतर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे डॉक्टरांनी काही पथ्थ पाळायला सांगितली आहेत. डॉक्टरांनी सूचविलेल्या पथ्यानुसार तयार केलेल्या जेवणाचा डबा राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला आणि राज यांची आई कुंदा ठाकरे या उद्धव यांच्यासाठी देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी मिळाली आहे.
 
छातीत कळ आल्याने उद्धव ठाकरे यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. राज ठाकरे यांनी आपले रक्ताचे नाते जपत आपला अलिबाग दौरा अर्धवट सोडून थेट लीलावतीत धाव घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यादिवशी संध्याकाळी उद्धव यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर नेले होते. एकाच दिवसात दोन वेळा राज यांनी उद्धव यांची भेट घेतली होती.
 
उद्धव यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचे  निश्चित  झाल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. जलील परकार यांच्याशी फोनवरून या शस्त्रक्रियेबद्दल चर्चा केली. त्यानंतर बाळासाहेबांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शस्त्रक्रियेच्यावेळी उद्धव यांच्यासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
 
सुमारे तासभर चालणाऱ्या या शस्त्रक्रियेसाठी राज यांना ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली आहे. तर उद्धव यांच्यावरील शस्त्रक्रियेच्यावेळी त्यांचा मुलगा आदित्य आणि पत्नी रश्मी यादेखील लीलावतीमधील व्हिजिटिंग रुममध्ये उपस्थित राहणार आहेत.

First Published: Friday, July 20, 2012, 11:35


comments powered by Disqus