हॅलो 'मी तुझी मैत्रीण बोलतेय'.... व्हा सावध... - Marathi News 24taas.com

हॅलो 'मी तुझी मैत्रीण बोलतेय'.... व्हा सावध...

www.24taas.com, मुंबई
 
एखाद्या मुलीचा तुम्हांला फोन आला,  आणि ती तुमच्याशी जवळकी साधून बोलण्याचा प्रयत्न करीत असेल, तर मात्र लगेचच सावध व्हा. ‘मी तुझ्या वर्गात होते. आपण एकाच शाळेत शिकलो होतो. मला तू भेट. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे’, असे मोबाईलवर बोलून तरुणांना आकर्षित करणार्‍या आणि जाळ्यात सापडताच त्याला अज्ञातस्थळी बोलावून लुटणार्‍या तरुण-तरुणींच्या एका टोळीला अतिरिक्त पोलीस पथकाने नालासोपारा येथे धाड घालून नुकतीच अटक केली.
 
कांदिवली (पूर्व) येथे राहणार्‍या तरुणाला एका तरुणीचा मंजुळ आवाजात गेल्या आठवड्यात फोन आला. ‘मी सोनम बोलत आहे. आपण कांदिवलीच्या शाळेत एकत्र शिकलो आहे’, असे बोलून तिने भेटण्यासाठी वारंवार आग्रह केला. अखेर तो त्या अनोळखी मुलीला भेटायला तयार झाला. कांदिवलीच्या ‘रघुलीला मॉल’जवळ सोनम नाव सांगणार्‍या मुलीला तो भेटला. परंतु गप्पागोष्टी सुरू असतानाच मोटारीतून दोन तरुण उतरले. त्यांनी ‘लडकी के साथ बात करता है क्या’ असे बोलून केळकरला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला आपल्या क्वॉलिस गाडीत कोंबले आणि त्याच्याकडील सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल, रोकड तसेच अभ्युदय बँकेचे एटीएम कार्ड काढून घेऊन त्याला गाडीतून हाकलून दिले.
 
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आणि एक पथक नेमून तपास सुरू केला असता सोनम नावाची केळकरला फोन करून रघुलीला मॉलजवळ बोलाविणारी १७ वर्षांची कुमारी पूजा कुंची कुर्वे हीच असल्याचे उघड झाले. नालासोपारा येथे धाड घालून प्रथम सोनम नावाने वावरणार्‍या पूजा, तिचा साथीदार मोहम्मद नूर मुल्ला (२०) यांना अटक केली. त्यानंतर राज ऊर्फ अजय श्याम परमार (२०), रमेश ऊर्फ विजय श्याम परमार (२३), आदित्य शोभनाथ यादव (१७), तसेच कुमारी मंदा राजेंद्र पासवान (१७) अशा एकूण सहा जणांना अटक केली.
 
त्यात दोन अल्पवयीन मुली आहेत. यापूर्वीही अटकेत असलेल्या अल्पवयीन मुलींनी मोबाईलवर संपर्क साधून बर्‍याच तरुणांना अज्ञातस्थळी बोलावून त्यांना आपल्या साथीदारांमार्फत मारझोड करून लुटले असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत, अशी माहिती उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी दिली.
 
 

First Published: Saturday, July 21, 2012, 08:38


comments powered by Disqus