Last Updated: Saturday, July 21, 2012, 15:50
www.24taas.com, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या नाराजीनाट्यानंतर आज मुंबईत त्याचा दुसरा अंक सुरु झाला. शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. राज्यातल्या आघाडीत समन्वय नसून केंद्राप्रमाणं राज्यातही राष्ट्रवादी समाधानी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय. तसंच शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा यूपीएनं करुन घ्यायला हवं, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
.काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला संघर्ष आता जाहीरपणे समोर आलाय. काँग्रेस कधी नव्हे ती आक्रमक होऊ लागल्यानं राष्ट्रवादी दुखावलीय. यापूर्वी राष्ट्रवादीपुढे नमती भूमिका घेणारी काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून सरकारमध्ये आक्रमक झालीय. विशेषतः चव्हाण यांची कठोर भूमिका राष्ट्रवादीतला असंतोष वाढवण्यास कारणीभूत ठरलीय. दोन्ही काँग्रेसला सत्तेसाठी एकमेकांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवर नाराजीचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या दबावतंत्रापुढे काँग्रेस झुकणार का याचीही उत्सुकता आहे.
.
First Published: Saturday, July 21, 2012, 15:50