मोटरमेनचं आंदोलन बेतलं महिलेच्या जीवावर - Marathi News 24taas.com

मोटरमेनचं आंदोलन बेतलं महिलेच्या जीवावर

www.24taas.com, मुंबई
मुंबईत काल पश्चिम रेल्वेच्या मोटरमेननं केलेल्या आंदोलनामुळे उसळलेल्या गर्दीत एका महिला प्रवाशाचा नाहक बळी गेल्याची घटना समोर आलीय. पालघरच्या रिना कुलकर्णी या महिलेचा बोरिवलीजवळ ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय.
 
शुक्रवारी आपल्या विविध मागण्यांसाठी पश्चिम रेल्वेचे जवळजवळ २०० मोटरमेननं सामूहिक रजेचा मार्ग स्विकारला. अचानक पुकारलेल्या या आंदोलनाची कल्पना ना रेल्वे प्रशासनाला होती ना प्रवाशांना. त्यामुळे पश्चिम रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची एकच गर्दी उसळली आणि मोटरमेन्सच्या आंदोलनाची किंमत मात्र एका महिलेनं आपला जीव गमावून चुकवली.
 
गर्दीमुळे पश्चिम रेल्वेची लोकलसेवा ठप्प झाली असताना आलेल्या कोणत्याही ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवासी गर्दी करत होते. पश्चिम मार्गावर बेस्ट प्रशासनानं सोडलेल्या ज्यादा बसेसही केवळ बोरिवलीपर्यंतच उपलब्ध होत्या. त्यातच विरार पालघरकडे जाणाऱ्या प्रवाशांना अन्य पर्याय नसल्यानं मेल गाड्यांना मोठी गर्दी होत होती. फ्लाईंग राणी एक्सप्रेस बोरिवली स्थानकात आली तेव्हा प्रवाशांची अशीच झुंबड उडाली. त्या गर्दीत पालघरकडे जाणाऱ्या रिना कुलकर्णीही सामील झाला खऱ्या पण रेटारेटीत त्यांच्यासह दोन, तीन महिला रेल्वेतून पडल्या. या घटनेत रिना कुलकर्णींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
आंदोलनामुळे प्रवाशांना वेठीस धरल्याबद्दल मोटरमेन्स आणि रेल्वे प्रशासनाबद्दल प्रवाशांमध्ये चीड होती. त्यात एका महिला प्रवाशाचा जीव गेल्यानं याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय. रेल्वे प्रवाशांच्या जीवाला मोलच नाही का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय.
 
.

First Published: Saturday, July 21, 2012, 17:24


comments powered by Disqus