सेनाप्रमुख ‘लिलावती’त दाखल - Marathi News 24taas.com

सेनाप्रमुख ‘लिलावती’त दाखल

www.24taas.com, मुंबई 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पुढचे पाच दिवस तरी त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. पण घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
 
नुकतेच शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे हॉस्पिटलमधून घरी दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय न होतेय तोच आता बाळासाहेब ठाकरे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बाळासाहेबांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्यानं त्यांच्या काही महत्त्वाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
 
मे महिन्यातही श्वसनाचा त्रास जाणवल्यानं बाळासाहेबांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतर आणि प्रकृती थोडी स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
 
उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरे यांनी अनेकदा त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. दोघा भावांमधला वाद थोडा निवळल्यासारखं वाटलं होतं. त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे आजारी असताना राज ठाकरे पुन्हा ठाकरे कुटुंबीयांत सामील होणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.
 
.
 
.

First Published: Tuesday, July 24, 2012, 13:27


comments powered by Disqus