Last Updated: Thursday, August 2, 2012, 00:14
www.24taas.com, मुंबई‘राज ट्रॅव्हल्स’ या नामांकित कंपनीचे मालक ललित शेठ यांनी बुधवारी सी-लिंकवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केलीय. ‘राज ट्रॅव्हल्स’ ही देशातील प्रमुख ट्रॅव्हल एजन्सीपैकी एक गणली जाते.
पोलीस उपायुक्त धनंजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ५६ वर्षीय ललित शेठ आज दुपारी बांद्रा-वरळी ‘सी-लिंक’वरून आपल्या गाडीमधून जात होते. अचानक, त्यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं आणि ललित शेठ पुलावर मध्येच गाडीतून खाली उतरले. आपल्याला पुलावर पायी चालायचंय असं सांगून त्यांनी ड्रायव्हरला गाडी हळूहळू पुढे नेण्यास सांगितले. ड्रायव्हरनं गाडी थोडी पुढे घेतली अन् त्याच्या लक्षात आलं की ललित शेठ यांनी पुलावरून समुद्रात उडी घेतलीय. त्यांचं शव वरळी गावाच्या नजीक पोलिसांच्या हाती लागलं. सूत्रांच्या माहितीनुसार आर्थिक नुकसानीमुळे ललित शेठ यांनी आत्महत्येचं पाऊल उचललंय.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच सी-लिंकवरून काही दिवसांपूर्वी एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला वाचवणाऱ्या वरळी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल गुणाजी पाटील यांना ‘राज ट्रॅव्हल्स’कडून थायलंड आणि मलेशियावारीची ऑफर दिली गेली होती आणि राज ट्रॅव्हल्सचे मालक ललित शेठ यांनीही आत्महत्येसाठी हीच जाग निवडली हा निव्वळ योगायोग...
.
First Published: Thursday, August 2, 2012, 00:14