दुष्काळ : केंद्राकडून राज्याला मदत - पवार - Marathi News 24taas.com

दुष्काळ : केंद्राकडून राज्याला मदत - पवार

www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याने केंद्र सरकारकडून राज्याला सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्‍वासन आज  केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्ष पातळीवर दुष्काळ परिषदेचं आयोजन केले होते.  त्यावेळी ही माहिती पवारांनी दिली.
 
दुष्काळ परिषदेला  पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, मंत्री आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार म्हणाले, की १९७२च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ मोठा असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. सोलापूर आणि नाशिकमध्ये पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे स्पष्ट केले.
 
परतीच्या पावसाचे चित्र आशादायक नाही. बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते काम करीत असल्याचे समाधान आहे.  पुणे स्फोटांवर शरद पवार म्हणाले, की अशा घटना टाळण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचे जाळे अधिक मजबूत करण्याची गरज आहे.
 
दुष्काळामुळे राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालीय. जनावरांच्या चा-याचाही प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी कोणती पावलं उचलायची याबाबत नेमका काय निर्णय झाला, याबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही.

First Published: Saturday, August 4, 2012, 18:43


comments powered by Disqus