उद्धव याचं 'राज'कारण, राष्ट्रपतींची घेतली भेट - Marathi News 24taas.com

उद्धव याचं 'राज'कारण, राष्ट्रपतींची घेतली भेट

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
काल राज ठाकरे यांनी सीमावासियांविषयी एक वेगळीच भुमिका घेतल्याने, सीमाभागातील मराठी बांधवानीं त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. तसचं उद्घव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना शह देण्यासाठी आज उद्घव ठाकरे हे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भेटीला गेले.
 
वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करून कानडी आणीबाणी संपवा अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडे केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सीमावासियांच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेऊन सीमावासियांच्या व्यथा-वेदना राष्ट्रपतींपुढे मांडल्या.
 
ही भेट झाल्यानंतर उद्धव यांनी सीमावादावर सूचवलेल्या व्यवहार्य तोडग्यावरही टीका केली. मानसन्मान मिळणार असेल तर कर्नाटकातच राहा, असा सल्ला राज यांनी काल सीमावासियांना दिला होता. त्यावर उद्धव यांनी टीका केली. देशाचं नशीब अशी मानसिकता असलेले लोक पारतंत्र्यात नव्हते, अन्यथा इंग्रजांनी सुधारणा केल्यात स्वातंत्र्य कशाला हवं असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला असता असा टोला त्यांनी राजना हाणला.

First Published: Tuesday, December 20, 2011, 11:10


comments powered by Disqus