Last Updated: Tuesday, December 20, 2011, 13:31
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईतल्या झवेरी बाजारातील एका सराफ दुकानातून तब्बल ५० लाखांचे दागिने चोरण्यात आलेत. मात्र ही चोरी कोणी सराईत चोरांनी केली नव्हती, तर त्या दुकानाची रखवालदारी कऱण्याची ज्याच्यावर जबाबदारी तोच रखवालदार चोर निघाला. त्यानं आपल्या एका साथीदाराला गुंगीचं औषध देउन सराफ दुकानातून लाखोंचे दागिने घेऊन पोबारा केला.
झवेरी बाजारातील मातोश्री जेल्वर्समध्ये सोमवारी सकाळी जेव्हा पोलिसांच पथक दाखल झालं, तेव्हा बघ्यांनी एकच गर्दी केली. रस्त्यावरुन येणारा जाणारा प्रत्त्येक व्यक्ती ‘मातोश्री जेल्वर्स’मध्ये डोकावून बघत होता. पोलिसांनी जेव्हा दुकानाची पहाणी केली तेव्हा दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि दुकानातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह दुकानातील महत्वाच्या सामानावर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला होता. अदल्या रात्री दुकान मालकाने दुकान बंद केल्यानंतर जेव्हा सकाळी पुन्हा शटर उघडलं, तेव्हा त्याच्या पायाखलची जमीनच सरकली. कारण चोराने त्यांचा दुकानातील प्रत्येक दागिन्यावर हात साफ केला होता.
दुकानात रात्रंदिवस दोन सुरक्षारक्षक तैनात असतानाही ही घटना कशी घडली असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र, या चोरीचा खरा सूत्रधार याच दुकानातील सुरक्षा रक्षक असल्याचं समोर येताच पोलिसही चक्राऊन गेले. या दुकानात काम करणाऱ्या देवराज मिश्रा नावाच्या वॉचमनचं रविवारी रात्री त्याच्या सोबत कामावर असलेल्या दुसऱ्या वॉचमनबरोबर कसल्यातरी करणावरुन भांडण झालं. हे भांडण असं काही वेगळं वळण घेईल याची साधी कल्पनाही या वॉचमनला नव्हती. याच भांडणाचा राग मनात ठेवत देवराज मिश्राने काम करत असलेल्या या दुकानाला लक्ष केलं आणि घटनेच्या रात्री देवराज मिश्रानं त्याच्या सोबत रात्रपाळीला असलेल्या दुसऱ्या वॉटमनला पाण्यातून गुंगीचे औषध दिलं. गुंगीचे औषध प्यायल्यानंतर काही वेळातच पिडीत वॉचमन बेशुद्ध झाला. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी वॉचमन मिश्रा सराफाचा दुकानात शिरला आणि दुकानातील ५० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला.
चोरी केल्यानंतर आरोपी वॉचमन मिश्रा फरार झाला. मात्र आरोपीचं हे चोरीचं कृत्य सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झालं. पोलीस याच सीसीटीवीचा माध्यामातून आरोपी वॉचमन मिश्राचा शोध घेत आहेत.
First Published: Tuesday, December 20, 2011, 13:31