सत्तर जागांचा राज यांना विश्वास - Marathi News 24taas.com

सत्तर जागांचा राज यांना विश्वास

झी २४ तास वेब टीम, मुंबई
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सत्तरहून अधिक जागा मिळतील असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला. मुंबईचे प्रश्न आणि समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. पालिकेत पंधरा वर्षे सत्तेवर राहूनही शिवसेनेने ठोस विकासाची कामे केली नाहीत, आता लाखो रुपये खर्च करण्याची शिवसेनेची अस्वस्थता दिसून येत असल्याचा टोलाही राज यांनी लगावला.
 
कृष्णभुवन या निवासस्थानी राज ठाकरे यांनी आज सकाळपासून सायंकाळपर्यंत पालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या सत्तर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीच्यावेळी राज यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हता.
 
प्रत्येकाचा बायोटेडा तपासून उमदवारांना वेगवेगळे प्रश्न राज विचारत होते. तिकीट मिळेल अथवा नाही याची चिंता या इच्छूकांना दिसत नव्हती तर राज यांना थेट भेटायला मिळाले याचाच आनंद मुलाखत देणाऱ्या उमेदवारांमध्ये दिसत होता. आमच्या मतदारसंघात तुम्ही ज्याला उमेदवारी द्याल, त्याच्यासाठी आम्ही काम करू, असे आश्वासन प्रत्येक उमेदवाराने राज यांना दिले.
 
मागठाणे, चारकोप, शिवडी, माहीम आदी दहा मतदारसंघातील इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. उद्या घाटकोपर पश्चिम, विक्रोळी, भांडूप, कलीना, चेंबूर, चांदिवली आणि विलेपार्ले येथील १०८ इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती राज ठाकरे घेणार आहेत.
या मुलाखतीदरम्यान बोलताना मनसेला मुंबईत सत्तरहून अधिक जागा मिळतील असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. मुंबई शहराचे प्रश्न प्रभावीपणे पालिकेत मांडणारे उमेदवार देण्यावर माझा भर आहे. त्यासाठीच यापूर्वी लेखी परीक्षा घेतली.
 

First Published: Wednesday, December 28, 2011, 15:46


comments powered by Disqus