Last Updated: Tuesday, January 3, 2012, 16:14
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तारखा आज जाहिर होणार असल्याने लगेचच आचारसंहिता लागू होणार असल्याने आचारसंहितेपूर्वी काही काळ पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांवर घोषणांची खैरात केली आहे. धारावी विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. याचा फायदा ६० हजार कुटुंबांना मिळणार आहे. सरकारी जमिनींचा विकास म्हाडा करणार असून, जुन्या चाळींना ४ एफएसआय देण्यात येणार आहे. धारावीकरांना ३०० स्क्वेअर फूटाचं घर मिळणार असून, १०० स्क्वेअर फूटचे घर त्यांना विकत घेता येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनं धारावीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज दुपारी साडेतीन वाजता जाहीर होणार असल्यानं उद्घाटनं आणि घोषणा करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्ष आणि नेत्यांची धावपळ उडाली आहे. संध्याकाळी नियोजित असलेले कार्यक्रम अनेकांनी सकाळीच उरकून घेतले. तर मुख्यमंत्र्यांनीही तातडीनं दुपारी पत्रकार परिषद बोलावल्यानं उरल्यासुरल्या घोषणा ते त्यात केल्या आहेत.
एकूणच आज निवडणुकीची घोषणा होईल याची कुणकुण लागताच सगळेच पक्ष खडबडून जागे झाले आणि त्यांनी प्रस्तावित असलेली उद्घाटनं आणि घोषणा सकाळीच उरकून टाकण्यासाठी धावपळ सुरु केली. कामगार कृती आराखडा जाहीर करण्याचा सरकारी कार्यक्रम संध्याकाळी होणार होता. तो दुपारीच उरकला गेला. तर शिवसेनेनं मुंबईत महापालिकेनं उभारलेल्या क्रिकेट गॅलरीचं उद्घाटन संध्याकाळऐवजी सकाळीच करून घेतलं. आता मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता पत्रकार परिषद बोलावून ते कोणत्या घोषणा करतात याची उत्सुकता आहे.
First Published: Tuesday, January 3, 2012, 16:14