लवासाचे वासे फिरले - Marathi News 24taas.com

लवासाचे वासे फिरले

झी 24 तास वेब टीम, मुंबई
 
पर्यावरण मंत्रालयाने लवासाच्या पहिल्या टप्प्याला परवानगी नाकारल्या प्रकरणी हिंदुस्थान कन्सट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित गुलाबचंद यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे प्रकल्पाला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे. पर्यावरण मंत्रालयाने बांधकामाला स्थगिती दिल्यामुळे रोज सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान कंपनीला सहन करावे लागत नाही.
 

लवासाच्या पहिल्या टप्प्याला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या अटींची पूर्तता होई पर्यंत परवानगी देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यात उभारण्यात येणाऱा लवासा प्रकल्प पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदुस्थान कन्सट्रक्शन कंपनी म्हणजे एचसीसी तब्बल पंधरा हजार एकर जमीनीवर या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करत आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयामुळे प्रकल्पाला मोठा धक्का बसणार आहे.
 
प्रकल्प उभारणीसाठी पर्यावरण मंत्रालयाकडून आवश्यक ती परवानगी न घेतल्याने बांधकामाला स्थगिती देण्यात आली होती. एचसीसीला आता मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. या आधी आदिवासींच्या जमिनींवर प्रकल्प उभारला जात असल्याचा वाद निर्माण झाला होता. तसेच लवासाच्या उभारणीत सर्वच नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचे म्हण्णे होते. पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयाने एक प्रकारे त्यावर शिक्कामोर्तबच झालं आहे.

First Published: Friday, October 14, 2011, 14:54


comments powered by Disqus