नायजेरियन ठगांना जेलची 'लॉटरी' - Marathi News 24taas.com

नायजेरियन ठगांना जेलची 'लॉटरी'

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई पोलीस क्राईम ब्रांचच्या युनिट सातनं नायजेरियन टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट पासपोर्ट, लाखो रुपयांची रोकड, बोगस सर्टिफिकेट्स, लॅपटॉप तसंच इतर साहित्य जप्त केलंय. लॉटरीच्या जाहिराती बनवून मेल तसंच एसएमएसद्वारे लोकांची फसवणूक ही टोळी करायची.
 
मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या या नायजेरीयन नागरिकांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या नायजेरीयन नागरिकांनी ई-मेल आणि एसएमएसद्वारे अनेकांना लाखो पाऊंड्सची लॉटरी काढायचे आमिष दाखवत त्यांना लुटलंय. या टोळीने प्रोसेसिंग फीच्या नावानं अनेकांकडून लाखो रुपयांची कमाई केली होती. ही रक्कम ते वकिलांची फी, कस्टम चार्जेस आणि पॉवर ऑफ ऍटर्नी तयार करण्याच्या बहाण्यानं लुटत होते. कोट्यावधी रुपयांचं आमिष दाखवत ते लोकांकडून चार ते पाच लाखांची लूट करायचे.
 
गुन्हे शाखेने गोरेगावातील आरे कॉलनीत छापा मारून या टोळीकडून बड्या कंपन्यांची बनावट प्रमाणपत्रे, १४ लॅपटॉप, १५ डेटाकार्ड, ७ पेन ड्राईव्ह, २३ मोबाईल, प्रिंटर आणि पासपोर्ट जप्त केलेत. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार या टोळीने गेल्या दोन वर्षांत हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाखोंचा चुना लावला आहे.
 
या टोळीत आणखी किती लोक कार्यरत आहेत याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. तर याप्रकरणी नागरीकांना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.

First Published: Tuesday, January 3, 2012, 18:52


comments powered by Disqus