नाद करायचा नाय - अजितदादा - Marathi News 24taas.com

नाद करायचा नाय - अजितदादा

झी २४ तास वेब टीम, सातारा/मुंबई
 
लोडशेडिंगवरून सुरु झालेला राजकीय वाद आता हातघाईवर आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी माझ्या नादाला लागू नये, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी सातारा येथील जाहीर सभेत भरला.

माणिकराव ठाकरे माझ्या कार्यपद्धतीविषयी नाराज असतील, तर कॉंग्रेसने माझे ऊर्जामंत्री खाते काढावं, असे परखड मत ऊर्जामंत्री पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर वादाला तोंड फुटलं. लोडशेडिंगवरून सुरू झालेला राजकीय वादाबाबत ऊर्जामंत्री अजित पवारांनी तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना इशारा दिलाय. 'माझ्या नादाला लागू नका' अशा भाषेत अजित पवारांनी सातारच्या जाहीर सभेत माणिकराव ठाकरेंना टोला लगावला.
 
इतक्यावर थांबतील ते अजित पवार कसले. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचं अज्ञान अजून कमी झालेलं नाही, अशी मुक्ताफळंही पवारांनी या वेळी उधळली.
 

 
यावरून लोडशेडिंग सुरू असताना ऐन दिवाळीच्या धामधुमीत हा राजकीय शिमगा लवकर शमणार नसल्याची चिन्हं दिसताहेत.  आता यात उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या वादात उडी घेतलीय. ‘भांडत काय बसता, आधी जनतेची कामं करा', असा टोला उद्धव यांनी माणिकराव आणि अजित पवार यांना लगावला.

First Published: Sunday, October 16, 2011, 10:52


comments powered by Disqus