राज ठाकरेंची मनमोकळी मुलाखत - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंची मनमोकळी मुलाखत

www.24taas.com, मुंबई 
 राज ठाकरेंच्या मनमोकळ्या मुलाखतीने दादरच्या वनिता समाजातील आयोजित कार्यक्रम विलक्षण रंगतदार झाला. वनिता समाजाच्या सदस्यांनी केलेल्या प्रश्नांच्या फैरीला राज ठाकरे सविस्तर उत्तर दिल्याने उपस्थितांची मनं जिंकली.
मनसेची स्थापना करण्यामागे विचार काय होता, यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, भाषावार प्रांतरचनेमागे स्थानिक भूमिपूत्राच्या हक्कांना प्राधान्य देण्याचा विचार होता. मीही पक्ष काढताना मराठी तरुण-तरुणींना त्यांच्या हक्काचं जे आहे ते मिळाले पाहिजे, असा विचार केला होता.
 
ते पुढे म्हणाले, की वास्तव कटू असलं तरी ते सांगितलंच पाहिजे. हिंदी ही आपली राष्ट्र भाषा नाही असं मी म्हटलं तेव्हा सर्वजण माझ्या अंगावर आले होते. पण आता गुजरात उच्च न्यायालयाने तशा स्वरुपाचा निर्णय दिला आहे. आता माझ्या विरोधात गळा काढणारे कुठे गेले.
 
शेतकरी जीन्स आणि टी-शर्ट घालून ट्रॅक्टर चालवताना पाहायचं यामागे शेतीला ग्लॅमर प्राप्त झालं पाहिजं हा विचार होता. मी शेतकऱ्यांना टीशर्ट आणि जीन्स वाटपाचा कार्यक्रम हाती घेणार नव्हतो. पण शेतीतून पैसे मिळाले पाहिजेत तरच तरुण शेतीकडे वळतील असं आपलं मत असल्याचं राज ठाकरेंनी व्यक्त केलं. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि जमीन पिकवून नव्हे तर ती विकून पैसे मिळवत आहेत.
 
माझ्या पक्षाकडे एक हाती सत्ता सोपवल्यास मला विकास करुन दाखवता येईल. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी असोत की बिहारमध्ये नितीशकुमार त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळेच त्यांना प्रगती करता आली आहे.
 
माझ्या आधीच्या लोकांनी मराठीचा मुद्दा मांडला असला, तरी मी अधिक पुरांव्यानिशी आणि टेक्निकली बोलतो असं म्हणून राज ठाकरे यांनी बाळासाहेबांपेक्षा मी अधिक टेक्निकली बोलतो असा टोला हाणला.
 

 
 

First Published: Friday, January 6, 2012, 18:52


comments powered by Disqus