Last Updated: Wednesday, January 11, 2012, 16:38
www.24taas.com, मुंबई 
भाजपच्या नव्या नेतृत्वाबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नाराजीचा सूर लावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांनी भाजपच्या नव्या नेतृत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचं टाळलं. पण जे उत्तर दिलं आहे त्यात भाजपच्या नेतृत्वाबद्दल नाराजीच दिसते आहे.
भाजपबरोबर नातं कसं आहे या प्रश्नावर हा प्रश्न विचारण्याची गरज आहे का? असा उलट सवाल त्यांनी केला. नाती प्रेमाची आणि व्यावसायिक असा दोन प्रकारची असतात. भाजपच्या आधीच्या पिढीतली माणसं महान आणि श्रेष्ठ होती असं सांगत वाजपेयी, अडवाणी यांच्याबद्दल बाळासाहेबांनी गौरवोद्रार काढले. पण नव्या पिढीबाबत बोलायचं टाळलं.
शिवसेनाप्रमुख म्हणून आणि निवडणूक लढवायची नसती तर आमचा रंग निराळा असता असं सांगत त्यांनी भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाबाबत नाराजीचा सूर लावला. निवडणुकीच्या फंदात फसल्यानं तोलून, मापून बोलावं लागतं, असं सांगत त्यांनी भाजप बरोबरच्या संबंधांवर आणखी बोलण्यास नकार दिला. गेले काही दिवस भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष यामुळे पक्षाचं मात्र नुकसान होत असल्याचे बाळासाहेबांना जाणवत असलं तरी त्यावर त्यांनी भाष्य करणं मात्र टाळलं
First Published: Wednesday, January 11, 2012, 16:38