मराठी अड्ड्यावर तरुणाईचा जल्लोष - Marathi News 24taas.com

मराठी अड्ड्यावर तरुणाईचा जल्लोष

www.24taas.com, मुंबई
 
मराठी माणूस एकत्र येत नाही, असं म्हटलं जातं, पण मराठी अड्डा या सोशल नेटवर्किंग साइटने दिलेल्या हाकेला ओ देत सुमारे २००० मराठी तरूण-तरुणी काल मुंबई जमले होते. निमित्त होते मराठी अड्डा या सोशल नेटवर्किंग साइटच्या दुसऱ्या वार्षिक स्नेह संमेलनाचे.
 
 
मराठी माणसांना एकत्र आणणे आणि एकत्र येऊन पुढे जाणे. आपले अस्तित्व टिकून राहावे आणि मराठी भाषा, संस्कृती टिकून राहावी, जगभर मराठी भाषेचा प्रसार व्हावा, या उद्देशाने लहू गावडे या तरूणाने www.marathiadda.com या सोशल नेटवर्किंग साइटचे २६ ऑक्टोबर २००८ ला बीज रोपण केलं. आता या मराठी अड्ड्याचा वटवृक्ष झाला असून सुमारे २२ हजार सभासद या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत.
 
 
दिनांक १५ जानेवारी २०१२ ला मराठी अड्ड्याचा  दुसरा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. यात मुंबई, सातारा, पुणे, नाशिक, कोकण, सांगली, औरंगाबाद इ. शहरातून २०००हून अधिक सभासद आले होते. सोहळ्यामध्ये मराठी अड्ड्याच्या मुलांनी नाटक, नृत्य, कविता वाचन, कॉमेडी, पपेट शो ई कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे झी २४ तासचे ऑनलाइन संपादक प्रशांत जाधव,  शैलेश तांडेल होते.
 
 
सोशन नेटवर्किंगच्या माध्यमातून येवढ्या मोठ्या प्रमाणात तरूण-तरूणी एकत्र येतात, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मराठीला समृद्ध करण्यासाठी लहू गावडे सारख्या तरुणांची गरज आहे. सरकार मराठी भाषेसाठी काहीच करणार नाही, लहूसारखे तरूण पुढे आल्याने मराठीला उज्ज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन झी २४ तासचे ऑनलाइन संपादक प्रशांत जाधव यांनी केले.
 
 
वेबसाइट संस्थापक लहू गावडे यांनी सभासदांना एक होऊन पुढे जा आणि मेहनत करून, कणखर बनून महाराष्ट्राच्या भिंती मजबूत करा असा संदेश दिला. मराठी माणूस एक व्हावा म्हणून मराठी अड्डा संमेलन, मराठी दांडिया, किल्ला सफाई, गरीब विद्यार्थ्यांना मदत अशी निस्वार्थीपणाने काम करत आहे. यावेळी खऱ्या अर्थाने मराठी माणसांना एक होण्याची खरी गरज आहे.

First Published: Tuesday, January 17, 2012, 11:40


comments powered by Disqus