बाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही हे दुर्दैव- ढसाळ - Marathi News 24taas.com

बाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही हे दुर्दैव- ढसाळ

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या जागा वाटपांबाबत नामदेव ढसाळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं वचन पाळलं नाही हे दुर्दैव अशी प्रतिक्रिया नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केली.
 
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइं अशी महायुती झाली असली तरी जागावाटपांबाबत नाराजी अजुनही कायमच आहे. रामदास आठवलेंच्या रिपाइंला २९ जागा सोडण्यात आल्या आहेत. रामदेव आठवलेंनी हारणाऱ्या जागा आमच्या वाट्याला आल्याचं स्पष्टपणे बोलून दाखवलं. रिपाइंला वरळी, विक्रोळी आणि मुलुंडच्या पट्ट्यात जिथे रिपाइंचे पारंपारिक मतदार आहेत तिथे एकही प्रभाग मिळाला नाही. आठवले सुरवातीपासून ३० जागांसाठी आग्रही होते पण अखेरीस २९ जागांवर त्यांची समजुत काढण्यात सेना-भाजपच्या नेत्यांना यश आलं.
 
चेंबुरमध्ये रिपाइंला डावलण्यात आल्याने दीपक निकाळजेंनी आम्हाला वेगळा मार्ग शोधावा लागेल अशी धमकीच दिली आहे. रिपाइंच्या वाट्याला खुले प्रभाग आले असल्याने तिथे ताकदीचे उमेदवार देणं हे एक मोठं आव्हानच असेल. रिपाइंच्या कोट्यातल्या पाच जागा नामदेव ढसाळांच्या कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहेत.
 
महायुतीच्या बैठकीच्या वेळेसच कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणुक दिल्याने नामदेव ढसाळ संतप्त झाले होते. रिपाइंचे नेते माजले असल्याची जळजळीत प्रतिक्रिया ढसाळांनी व्यक्त केली होती. त्यावेळेस ढसाळांची समजुत काढू असं रामदास आठवले म्हणाले होते. अद्यापतरी हा तिढा सुटु शकलेला नाही हेच ढसाळांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होतं.

First Published: Thursday, January 19, 2012, 17:39


comments powered by Disqus