'रेल्वे' तिकीटांचा काळा बाजार! - Marathi News 24taas.com

'रेल्वे' तिकीटांचा काळा बाजार!

www.24taas.com, मुंबई
 
गेल्या काही दिवंसापूर्वी मुंबईच्या नागपाडा परिसरातल्या एका कार्यालयावर छापा मारुन आरपीएफने १ लाख ६ हजार रुपये किमतीची १२६ रेल्वे तिकीटं जप्त केली आहेत. ही तिकिटं ज्या इसमांकडून जप्त करण्यात आलीत तो रेल्वेचा अधिकृत एजंट आहेत. मात्र त्यांच्याकडे जी तिकीटं आढळून आली आहेत ती तिकीट विंडोवरुनच खरेदी केली होती..त्यामुळे त्यानं एवढया मोठ्या प्रमाणात ही तिकिटं कशासाठी खरेदी केली होती, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
 
भुगेंद्र भैरवनाथ मिश्रा नावाच्या इसमाकडून ही १ लाख ६ हजार रुपये किमतीची १२६ रेल्वे तिकीटं जप्त केली आहेत.भुगेंद्रचं नागपाडा परिसरात रेल्वे तिकिटांचं इ-बुकींग करण्याचं कार्यालय आहे. तसेच त्याच्याजवळ आईआरसीटीसीचं इ-तिकीट बुक करण्याचा परवाना आहे.मात्र त्याच्याकडून जे रेल्वे तिकीटं जप्त करण्यात आली आहेत. ती तिकिटं बुकींग विंडोवरुनच काढली जातात आणि ही तिकीटं विकण्याचा त्याला कोणताही अधिकारही नाही. मग त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटं आली कुठून, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. ही सर्व तिकीटं पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातून घेण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात काही भ्रष्ट रेल्वे कर्मचाऱ्यांचाही हात असल्याचा संशय आरपीएफने व्यक्त केला आहे.
 
आरपीएफ आणि  रेल्वे कमर्शियल ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे,त्यांनी भुगेंद्रच्या कार्यालयावर छापा मारुन त्याला रंगेहाथ अटक केली आहे. रेल्वेचे अधिकारी भुगेंद्रकडे याप्रकरणी अधिक चौकशी करत असून त्याला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे याचा ते शोध घेत आहेत. एकट्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात एक लाखाहून अधिक किंमतीच्या रेल्वे तिकिटांचा काळाबाजार कऱणाऱ्या या भुगेंद्रच्या काळ्याधंद्यात रेल्वेतील काही भ्रष्ट कर्मचारी आणि काही दलालांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 

First Published: Thursday, February 2, 2012, 16:09


comments powered by Disqus