पवारांचा सेनेला छुपा पाठिंबा? - राज - Marathi News 24taas.com

पवारांचा सेनेला छुपा पाठिंबा? - राज

www.24taas.com, मुंबई
 
 
 
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेला मदत केली की नाही हे तपासून पाहावे लागेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने दुसऱ्याला मागून सपोर्ट दिला की काय? हेही तपासून पाहायला पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी सांगितले. या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय झाला की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला याचेही  अॅनालिसिस करावे लागेल, असा चिमटा राज यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना काढला.
 
 
पालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माझ्या पक्षाच्या यशाबाबत मी समाधानी आहे. ठाण्यात फारसे यश मिळालेले नाही. त्याठिकाणी पक्ष कार्यकारणीत बदल केले जातील. मात्र, जे चुकले आहेत त्यांना मी माफ करणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे येथील मतदारांनी आपल्या पक्षावर विश्वास टाकला आहे, असे ते म्हणाले.
 
 
पक्षाच्या यशाबाबत समाधान व्यक्त करण्याबरोबरच आपल्याला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने कमी जागा मिळाल्याचे राज यांनी सांगितले. बऱ्याच गोष्टी एकाच्या अंगावर पडल्याने प्रचार सभा कमी झाल्यात. मात्र, ज्या ठिकाणी त्रिशंकू परिस्थिती असेल त्याठिकाणी परिस्थिनुसार निर्णय घेतला जाईल. याबाबत तपासनी सुरू आहे. काही वेळानंतर निर्णय घेतला जाईल, असे राज म्हणाले.
 
 
मुंबई आणि ठाण्यात भारतीय जनता पक्षामुळे शिवसेनेची सत्ता मिळाली आहे. त्यातच पवारांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य होत नाही. तसेच सर्वात कमी मतदान कुलाब्यात झाले, तिथलं लोक पेज ३ वर चोची मारत असतात, त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. जे मतदार मतदान करत नाहीत त्यांच्याबाबतीत कठोर पाऊले उचलायला हवीत, असे सागून राज म्हणाले महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी माझे कार्यकर्ते आहेत. लवकरच मी ग्रामीण महाराष्ट्राचा दौरा काढणार आहे, असे राज यांनी यावेळी अगामी दौऱ्याची नांदी दिली.
 
-
 

First Published: Friday, February 17, 2012, 16:36


comments powered by Disqus