मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच - Marathi News 24taas.com

मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई शहर काँग्रेसपदावरुन कृपाशंकर सिंह यांच्या गच्छंतीनंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे.
 
 
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी मराठी चेह-याचा विचार होण्याची शक्यता आहे. विधान परिषद सदस्य आणि प्रवक्ते भाई जगताप,  चंद्रकांत हंडोरे, आणि काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे. भाई जगताप यांच्याकडं उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीची जबाबदारी आहे. त्यामुळं ते राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात. चंद्रकांत हंडोरे हे सलग दोन वेळा चेंबूरमधून विधानसभेवर निवडून आले आहेत. तसंच ते मुंबईचे माजी महापौर आहेत. जर्नादर चांदूरकर आणि चंद्रकांत हंडोर हे दोघेही मागासवर्गीय समाजातील आहेत.
 
चांदूरकर यांच्याकडे मराठी आणि दलित चेहरा म्हणूनही काँग्रेसमध्ये पाहिलं जातं. उच्चशिक्षीत असल्याने चांदूरकरांना पसंती मिळण्याची शक्यता आहे. तर अमराठी चेह-यांमध्ये काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबईच्या खासदार प्रिया दत्त यांचं नावही शर्यतीत आहेत.
 
 
गांधी घरण-याच्या जवळच्या, तरुण, महिला तसंच काँग्रेसमधल्या कामत, देवरा आणि कृपाशंकर सिंह यांना मान्य होईल असं हे नाव आहे. त्यामुळं अध्यक्षपदासाठी त्यांनाही पसंती मिळण्याची शक्यता आहे. तर उत्तर मुंबईचे खासदार संजय निरुपम यांचं नावही आघाडीवर आहे. उत्तर भारतीय चेहरा, फर्ड वक्तृत्व यामुळं त्यांनाही पसंती मिळण्याची शक्यता आहे.

First Published: Thursday, February 23, 2012, 11:13


comments powered by Disqus