Last Updated: Monday, February 27, 2012, 16:12
www.24taas.com, मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी बोलूनच महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रावर हल्ला केल्याचा गौप्यस्फोट खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलाय. जा आणि थोबाड फोडा असे बाळासाहेबांचे आदेश होते ते आपण पाळल्याचं अडसूळ यांनी सांगितलं.
ज्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी आली ती वाचल्यानंतर आपण मातोश्रीवर फोन केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांशी बोलायला सांगितलं. बाळासाहेबांनी जा आणि थोबाड फोडा असे आदेश दिले. त्यानंतर तत्काळ तोडफोड केल्याचं अडसूळ यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये २८ जानेवारी रोजी शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याची बातमी छापण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तोडफोड केली. दरम्यान तोडफोड प्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जवळपास दोनशे ते अडीचशे शिवसैनिकांनी मटाच्या ऑफिसमध्ये २८ जानेवारीला सकाळच्या सुमारास ऑफिसमध्ये घुसले आणि तिथे मोठ्याप्रमाणात धिंगाणा घालत तोडफोड केली होती.
काय दिलं होतं ‘मटा’ने वृत्त
राष्ट्रवादीच्या गळाला लागलेले खासदार म्हणजे शिवसेनेचे अमरावती येथील खासदार आणि को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ हेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पिचड यांनी घोषणा करताच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडीचे खासदार बळीराम जाधव यांच्या नावांची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, भावना गवळी, अनंत गीते, गणेश दुधगावकर यांच्या कडे बोटे उठली. मात्र, ही शक्यताही फोल ठरली. अखेर अडसूळ यांचेच नाव पुढे आले. अलीकडेच शिवसेनाप्रमुखांनी मातोश्रीमध्ये बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीस थाकुरमातूर कारण देऊन अडसूळ गैरहजर राहिलेहोते. दरम्यान, ‘पक्षाचा अध्यक्ष’ या पिचड यांनी केलेल्या शब्दप्रयोगामुळे तर्कवितर्कांना उधाण आले असून, पिचड यांना खरोखरच ‘पक्षाचा अध्यक्ष’ अभिप्रेत आहे की ‘पक्षाच्या छत्राखालील संघटनेचा अध्यक्ष’ ? याचा काथ्याकुट दिवसभर सुरू होता.
First Published: Monday, February 27, 2012, 16:12