Last Updated: Wednesday, February 29, 2012, 09:12
www.24taas.com, मुंबई मुंबईतील डासांना आता धुराचा त्रास सहन करावा लागणार नाही. कारण धूर सोडण्यापेक्षा चक्क इमारतीच जमीनदोस्त करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे धुरात डासांचा जीव आता गुदमरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अजबकारभाराची चर्चा जास्त आहे. १४ जुन्या झालेल्या आणि कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीमुळे डास संपणार आहेत का, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत असलेल्या पडक्या इमारती पाडण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. मुंबईकरांना मलेरियाचा त्रास होऊ नये म्हणून डासांवर पावसाळ्या-पूर्वीच नियंत्रण आणण्यासाठी अँन्टॉप हिलच्या १४ मोडकळीस इमारती आणि सहा गिरण्या पाडण्याच्या सूचना पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खाते (सीपीडब्ल्यूडी) आणि राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला (एनटीसी) दिल्या आहेत.

सीपीडब्ल्यूडी, भूदल, नौसेना, वायूदल, विमानतळ प्राधिकरण, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, म्हाडा अशा ३३ प्रमुख खात्यांच्या उपस्थित बैठक झाली त्यावेळी डासांवर प्रतिंबध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पाडण्यात येणार्या बंद गिरण्यांमध्ये डॉ. आंबेडकर स्मारकासाठी देण्यात येणार्या इंदू मिलचाही समावेश आहे. याशिवाय एनटीसीच्या मालकीच्या अपोलो, सीताराम, गोल्ड मोहर, मधुसूदन, दिग्विजय आणि इंदू मिल या सहा गिरण्यांचे नुसते सांगाडे उरले आहेत. या गिरण्यांच्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करा अथवा गिरण्यांचे उरलेसुरले सांगाडेही पाडून टाका, अशा सूचना सुबोधकुमार यांनी एनटीसीला केल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. भंगार सामान, पडक्या इमारती येथे पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे हे भंगार सामान हटविण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व प्राधिकरणांना दिले.
First Published: Wednesday, February 29, 2012, 09:12