Last Updated: Thursday, March 1, 2012, 20:05
www.24taas.com, मुंबई बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्य़ा कृपाशंकर सिंह यांची आता धावाधाव सुरू झाली आहे. हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने कृपाशंकर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. कृपाशंकर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार आहे.
दरम्यान कृपाशंकर सिंह यांच्या वांद्र्यातल्या बंगल्यामागं काही कचरा जाळण्यात आला आहे. हा कचरा म्हणजे क़ृपाशंकर सिंह यांच्या मालमत्तेसंबंधी कागदपत्रं असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.
पोलिसांकडून कृपांविरोधात ठोस कारवाईला सरुवात झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी बेनामी मालमत्तेसंदर्भातली कागदपत्र जाळली असावीत, असा संशय आहे. जळालेल्या कचऱ्यात कृपाशंकर सिंह यांच्या लेटरहेडच्या कागदाच्या तुकड्याचा समावेश आहे, त्यामुळे जाळण्यात आलेल्या कचऱ्याचं गूढ अधिकच वाढलं आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अशा प्रकाराचा इन्कार केला आहे.
पण कृपाशंकर यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे कोर्टाने आदेश दिल्यानंतर कृपाशंकर अज्ञातवासात गेले त्यानंतर अशा प्रकारे संशयस्पदरित्या काही कागदपत्र जाळण्याचे काम सुरू असल्याने कृपाशंकर यांच्याविरोधात संशय बळावत चालला आहे.
First Published: Thursday, March 1, 2012, 20:05