आज ठरणार मुंबईचे महापौर - Marathi News 24taas.com

आज ठरणार मुंबईचे महापौर

हेमंत बिर्जे, www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीची  निवडणूक आज होत आहे. महायुती ११४ या मॅजिक फिगरच्या जवळ असल्यानं शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित आहे. त्यामुळं आघाडीनं जरी उमेदवार उभे केले असले तरी ही निवडणूक म्हणजे केवळ औपचारीकता आहे.
 
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून उपमहापौरपदासाठी मोहन मिठबावकर रिंगणात आहेत. प्रभू हे गोरेगाव पूर्व भागातील आहेत. तर मिठबावकर बोरीवली पश्चिम भागातील नगरसेवक आहेत. महायुतीमध्ये शिवसेनेचे ७५, भाजप ३१, रिपाईचे १ असं संख्याबळ आहे. अखिल भारतीय सेनेच्या दोन नगरसेविकांचा पाठिंबा मिळाल्यानं महायुतीचं संख्याबळ १०९ झालं आहे. ११४ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी महायुतीला पाच जागांची गरज आहे. मात्र शिवसेना-भाजपचे चार बंडखोर आणि सहा अपक्षांचा महायुतीला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

 


दुसरीकडे आघाडीनं नायगाव दादर पूर्व भागातील सुनील मोरे यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली आहे. तर उपमहापौरपदासाठी विक्रोळीतल्या टागोरनगरमधल्या राष्ट्रवादीच्या हारुन खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आघाडीमध्ये काँग्रेसच्या ५१ जागा तर राष्ट्रवादीच्या १४ जागा आहेत. मनसेचे २८ आणि सपाचे ९ नगरसेवक तटस्थ राहण्याची शक्यता आहे.
 
आघाडीच्या वतीनं विजयाचे कितीही दावे केले जात असले तरी महायुतीचं संख्याबळ पाहता मुंबई पालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार हे निश्चित आहे. त्यामुळे निवडणुकीची औपचारीकता पुरी करणं बाकी आहे.
 
 

First Published: Friday, March 9, 2012, 15:27


comments powered by Disqus