Last Updated: Wednesday, March 21, 2012, 21:05
www.24taas.com, मुंबईराज्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं बाजी मारलीय. तर अनेक संधी साधू युती पहायला मिळाल्यात. मनसेनं ठाणे, औरंगाबादेत शिवसेना-भाजप युती धक्का दिलाय. नाशिकमध्ये शिवसेनेनं घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेला ठाणे मनपापाठोपाठ ठाणे जिल्हा परिषद आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसेनं उत्तर दिलंय.
औरंगाबादमध्ये मनसेच्या दोन सदस्यांनी आघाडीला मतदान केल्यानं काँग्रेसच्या नईदाबानो फेरोज यांची अध्यक्षपदी निवड झालीय. तर गोपीनाथ मुंडे यांच्या बीडमध्ये राष्ट्रवादीचे सय्यद अब्दुल्ला यांची निवड झालीय. भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं बीड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या मुंडेंच्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरुंग लावलाय.
घरकुल घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात शिवसेना भाजपसोबत गेल्यानं भाजपचे दिलीप खोडपे अध्यक्षपदी निवडून आलेत. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना-भाजप एकत्र येऊ शकले अशी चर्चा आहे. तर नागपुरात शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेत. त्यामुळं नागपुरच्या संध्या गोतमारे अध्यक्ष झाल्या आहेत. तर यवतमाळ, गडचिरोलीतही राष्ट्रवादीनं काँग्रेसनं दे धक्का दिलाय. या दोन्ही ठिकाणी शिवसेना-भाजपला साथीला घेऊन राष्ट्रवादीनं सत्ता स्थापन केलीय.
राज्यात आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक 14 ठिकाणी बाजी मारलीय. तर काँग्रेसला सात ठिकाणी अध्यक्षपदं मिळवता आलीत. महायुतीनं सहा ठिकाणी अध्यक्षपदं जिंकलीत. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीत अनेक ठिकाणी वेगळी समीकरणं पुढं आलीत. राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारत युतीच्या मदतीनं अमरावती, यवतमाळ, गडचिरोली याठिकाणी युतीच्या मदतीनं राष्ट्रवादीने अध्यक्षपद पटकावलय. तर चंद्रपूर आणि नागपुरात भाजपनं राष्ट्रवादीची साथ घेत आपला अध्यक्ष बसवलाय. यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीने धोबीपछाड दिलीय. तर रायगडमध्ये रिपाइंचा अध्यक्ष झालाय. औरंगाबाद आणि ठाण्यात मनसेच्या मदतीनं काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकलाय.
कोल्हापुरात काँग्रेसचा झेंडाकोल्हापूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय. काँग्रेसचे संजय मंडलिक यांची अध्यक्षपदावर निवड झालीय. तर उपाध्यक्षपद काँग्रेसच्याच हिंदूराव चौगुलेंना मिळालय. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून अमोल महाडीक इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळं त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीच्या बळावर अध्यक्षपद मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांना मदत करायला नकार दिला. त्यामुळं त्यांना माघार घ्यावी लागली. पुढची सव्वा वर्ष अध्यक्षपद महाडिक यांना देण्याचं आश्वासन देण्यात आलय.
माणिकरावांना दणका
यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दणका दिलाय. अमरावतीत राष्ट्रवादीने काँग्रेस विरोधात सर्वपक्षीय आघाडी उभारून दणका दिलाय. गडचिरोली आणि चंद्रपूरात राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालीय. त्यामुळं तिथं काँग्रेसला अध्यक्षपदं मिळाली नाहीत. गडचिरोलीत राष्ट्रवादीचा तर चंद्रपुरात भाजपचा अध्यक्ष झालाय. औरंगाबाद आणि ठाण्यात मनसेनं आघाडीला साथ दिली.
नगरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावलय. राष्ट्रवादीचे विठ्ठलराव लंघे यांची अध्यक्षपदी निवड झालीय. काँग्रेसनं युतीच्या पाठिंब्यावर अध्यक्षपद मिळवण्याची रणनिती आखली होती. मात्र मतदानावेळी युतीचे सदस्य गैरहजर राहीले. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका राजळे यांनी 35 मते मिळवत विजय मिळवला.
औरंगाबादमध्ये सेनेच्या गडाला सुरूंग
औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या दहा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागलाय. मनसेनं दोन्ही काँग्रेसला साथ दिल्यानं बालेकिल्ल्यात शिवसेनेला सत्ता गमवावी लागली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या नईदाबानो फिरोज पठाण यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाताई निकम यांची निवड झाली. अध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचा दहा मतांनी पराभव झाल्यानं जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला हादरा बसलाय. मनसेच्या मदतीची आघाडीने परतफेड करत त्यांना दोन समित्यांची सभापतीपदे दिलीत.
गोपीनाथ मुंडे चारीमुंड्या चीत!
बीड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तास्थापनेच्या गोपीनाथ मुंडेंच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीनं सुरुंग लावलाय. भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या 5 सदस्यांच्या मदतीनं राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारलीय.
नांदेडमध्ये दोन्ही काँग्रेसची मोट 
नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षपदी दिलीप पाटील बेटमोगरेकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश राठोड यांची निवड झालीय. बोटमोगरेकर आणि राठोड या दोघांचेच अर्ज या पदांसाठी आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. एकूण 64 सदस्यसंख्या असलेल्या नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे सर्वाधिक 27 सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसशी झालेल्या वाटाघाटीनंतर एका गटाने काँग्रेसला पाठिंबा द्यायला अनुकुलता दर्शवल्यानं काँग्रेसला अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षपदी निवड झालेले दिलीप पाटील बेटमोगरेकर हे काँग्रेस आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे भाऊ तर उपाध्यक्षपदी निवड झालेले प्रकाश राठोड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रदीप नाईक यांचे समर्थक ओळखले जातात.
पुणे राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला
पुणे आणि नाशिक जिल्हा परिषेदत राष्ट्रवादीनं वर्चस्व राखलय. इतर ठिकाणांप्रमाणे इथेही वेगळा पॅटर्न पहायला मिळाला. पुणे जिल्हा परिषद निवडमुकीत मनसेनं राष्ट्रवादीला साथ दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेस, शिवसेना आणि भाजप एकत्र आले. विशेष म्हणजे शिवसेनेनं आपला उमेदवार मागे घेत थेट काँग्रेसला पाठिंबा दिला होता. विरोधी पक्षआच्या एवढ्या उपद्वापानंतरही राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे अध्यपदी तर राष्ट्रवादीचेच प्रदीप कंद उपाध्यक्षपदी निवडून आले. तर नाशकात राष्ट्रवादीच्या जयश्री पवार आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसचे संपतराव सकाळे हे बिनविरोध निवडून आले.
First Published: Wednesday, March 21, 2012, 21:05