काढू नका छेड, करावी लागेल परतफेड... - Marathi News 24taas.com

काढू नका छेड, करावी लागेल परतफेड...

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुलींची छेड काढण्याचे प्रकार सरार्स वाढत आहेत. त्यामुळे या प्रकाराला आळा घातलाच गेला पाहिजे म्हणूनच मुलींची छेड काढणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले. त्यासाठी प्रत्येक कॉलेजात अँटी इव्ह टीझिंग कमिटी निर्माण केली जाणार आहे.
 
देशात महिलांसाठी सगळ्यात सुरक्षित शहरं म्हणून मुंबईची ओळख होती. मात्र अंबोलीत छेडछाड रोखू पाहणाऱ्या दोन तरुणांना गुंडांच्या हल्यात जीव गमवावा लागला. त्यामुळं पुन्हा एकदा मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढं आला. छेडछाड करणाऱ्यांना कुठलीच भिती नसल्यानं या घटना वाढल्या. त्यामुळं अखेर विद्यार्थ्यांनी गृहराज्यमंत्र्यांची भेट घेऊन रोडरोमियोंवर कारवाईची मागणी केली.
 
छे़डछाडींचा या घटना रोखण्यासाठी सरकारनं उपाययोजन करण्याचा निर्णय घेतला. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. साध्या गणवेशात कॉलेज परिसरात महिला पोलीस तैनात राहणार आहेत. छेडछाडीची तक्रार तरूणी १०३ या हेल्पलाईन नंबरवर करू शकतात. पोलीसांना ई-मेल वरूनही तरूणी आपली तक्रार नोंदवू शकणार आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये छेडछाड प्रतिबंधक कमिटी बनवण्यात येणार आहे. गुंडाच्या हल्ल्यात दोन तरूणांचे बळी गेल्यावर कारवाईसाठी सरकारवर दबाव होता. त्यामुळं सरकारनं अखेर पावलं उचलली आहेत. मात्र ती कागदावर रहायला नकोत ही अपेक्षा आहे.

First Published: Tuesday, November 15, 2011, 13:41


comments powered by Disqus