Last Updated: Friday, March 30, 2012, 17:21
www.24taas.com, मुंबई मुंबई विद्यापीठातील युवासेनेच्या ८ सिनेट सदस्यांना कुलगुरू राजन वेळुकर यांनी निलंबित केलं. कुलगुरू राजन वेळूकर यांना बडतर्फ करण्याची मागणी करत सिनेट सदस्यांनी विद्यापीठा बाहेर धरण आंदोलन केलं. मात्र युवासेनेचे सिनेट सदस्य राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जिंतेद्र आव्हाड आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी केला आहे.
‘कुलगुरू राजन वेळूकर हटाव, मुंबई विद्यापीठ बचाव’ अशा घोषणा या सिनेट सदस्यांना आता महागात पडल्या आहेत. मुंबई विद्यापीठातल्या घोळासंदर्भात युवासेनेनं केलेल्या आंदोलनानंतर कुलगुरु राजन वेळूकर यांनी युवासेनेच्या ८ सिनेट सदस्यांना निलंबित केलं. विद्यापीठाचा अर्थसंकल्प राज्यपालांनी सादर करण्याची युवासेनेची मागणी होती. तसंच T.Y.B.COM.च्या परिक्षेतील घोळाविरोधात कुलुगुरूंना युवासेनेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. बी.कॉमच्या अर्थशास्त्राचा पेपर जुन्या अभ्यासक्रमाऐवजी नव्या अभ्यासक्रमानुसार घेतल्याने ९०० विद्यार्थ्यांचं भवितव्य संकटात आहे, तर हॉल तिकीटावरील परिक्षा केंद्र एक आणि परीक्षा दुसऱ्याच केंद्रावर असल्याचेही प्रकार घडले होते. या सर्व मुद्यावरुन युवासेना आक्रमक तर झाली आहेच. शिवाय शिवसेनेनंही विधानपरिषदेत हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी कुलगुरू राजन वेळूकरांची भेट घेऊन या घोळासंदर्भात माहिती घेतली. तसंच कुलगुरूंच्या पाठिशी घालत युवासेना विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. मुंबई विद्यापीठाच्या कामकाजावरुन युवा सेना आक्रमक झाली असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीनंही यात उडी घेतलीय. त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रात पक्षीय राजकारण सुरु झाल्यानं मूळ प्रश्न बाजूलाच राहण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
First Published: Friday, March 30, 2012, 17:21