....तर मीही परीक्षा देणार - राज ठाकरे - Marathi News 24taas.com

....तर मीही परीक्षा देणार - राज ठाकरे

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यातील मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी तसच इच्छूक उमेदवारांचा मेळावा आज सकाळी 11 वाजता माटुंग्यातील षणमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शाब्दिक फटकेबाजी पुन्हा अनुभवायला मिळालीच त्याच बरोबर उमेदवार आणि कार्यकर्त्यांना योग्य त्या शब्दात कानपिचक्या दिल्या. नुकताच मनसेनं उमेदवारांसाठी परीक्षा घेण्याची घोषणा केली.
 
मनसेच्या ष्णमुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. महापालिकेसाठी इच्छुकांच्या लेखी परिक्षा घेणारच याचा पुनरुच्चार त्यांनी केली. तसंच कोणीही महापालिकेचं तिकीट गृहीत धरु नका असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. महापालिकेसारखी विधानसभेसाठीही परिक्षा घेणार असा इशाराही त्यांनी दिला. तसंच परिक्षेचा पेपर फोडण्याचा प्रय़त्न करु नका. शाळेसारख्या गोष्टी या परिक्षेत केल्या जाऊ दिल्या जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
 
महापालिकेत सत्ताधारी हा सक्षम आणि सुशिक्षत असाच हवा. त्यामुळे या निवडणूकीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी राज ठाकरे यांनी उमेदवारांची शाळाच घेतली. त्याबरोबरच योग्य त्या सूचना केल्या. म्हणजेच काही हुल्लडबाजी न करता परीक्षा द्या. असा सज्जड दमच राज ठाकरे यांनी भरला. त्याच बरोबर राज ठाकरे यांनी उमेदवारांची टेर घेण्यासाठी ५ किलोमीटर धावण्याची स्पर्धा घेणार असल्याचे सांगून एकच हास्यकल्लोळ उडवून दिला.
 
महापालिका निवडणुकांच्या उमेदवार निश्चितीसाठी राज्याच्या विविध भागात येत्या ४ डिसेंबरला सकाळी ११ ते साडे बारा या वेळात मनसे पदाधिकाऱ्यांच्या या लेखी परीक्षा पार पडणार आहेत. १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत परीक्षेचे फॉर्म वाटप होणार असून, २२ ते २४ नोव्हेंबरपर्यंत भरलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्जासाठी १ हजार रूपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक परीक्षार्थी इच्छुकाला हॉल तिकीट देण्यात येईल आणि परीक्षेत पास झाल्याशिवाय मुलाखतीला बोलावणार नाही. एखाद्या वॉर्डात एकही योग्य उमेदवार सापडला नाही तर तो वॉर्ड ऑप्शनला टाकेन. त्याठिकाणी मनसे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली.

First Published: Saturday, November 19, 2011, 08:30


comments powered by Disqus