मध्यरेल्वेची वाहतूक अजूनही उशिरानेच - Marathi News 24taas.com

मध्यरेल्वेची वाहतूक अजूनही उशिरानेच

www.24taas.com, मुंबई
 

मध्य रेल्वेची लोकल वाहूतक अजूनही उशिराने चालू आहे. रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नसल्यानं प्रवासी हैराण झाले आहेत.
 

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं विस्कळीत झालेली मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय. सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र तत्पूर्वी सकाळच्या सुमारास झालेल्या सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळं प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले.
 
मुंबई सीएसटीकडे जाणारी लोकल वाहतूक पूर्ण ठप्प होती. तर स्लो अप आणि डाऊन ट्रेन वाहतूक हळहळू सुरु होती. दोन स्टेशनमध्ये ट्रेन खोळंबल्यानं प्रवासी रुळांवरुन चालत स्टेशन गाठत होते. यावेळी काही ट्रेनच्या मोटरमन आणि गार्डसोबत प्रवाशांची शाब्दिक चकमकही उडत होती.
 
लोकलचा खोळंबा झाला असताना रेल्वे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा मात्र सुस्त असल्याचं दिसत होतं. सिग्नल यंत्रणा फेल झाल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतूकीवरही परिणाम झाला होता. काही वेळापूर्वीच सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाली असून फास्ट आणि स्लो मार्गावरची वाहतूक पूर्वपदावर येतेय. मात्र अजुनही काही ट्रेन उशीरानं धावत आहेत.
 
मध्य रेल्वेच्या गलथान कारभाराचा फटका आज प्रवाशांना पुन्हा सहन करावा लागला. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं सकाळी कुर्ला ते सीएसटी अप मार्गावरील वाहतूक जवळजवळ तासाभरासाठी ठप्प झाली होती. बराच वेळ लोकल्स दादर, कुर्ला स्टेशन्सवर उभ्या करण्यात आल्या होत्या.
 
विशेष म्हणजे रेल्वेकडून प्रवाशांना कोणतीही सूचना दिली जात नव्हती. अखेर प्रवशांनी ट्रॅकमधून चालत नियोजित ठिकाण गाठणं पसंत केलं. मुंबईत कामानिमित्त लोकलनं हजारो लोक ये-जा करतात त्यांच्यासाठी आजचा प्रवास अतिशय त्रासदायक ठरला.
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 11:44


comments powered by Disqus