Last Updated: Friday, April 13, 2012, 21:14
www.24taas.com, मुंबई बिहार दिनावरुन मनसे आणि नितीश कुमार यांच्यात अखेर समेट झाली. पण, यावर शिवसेनेने आपल्या खास शैलीत टीका केली आहे. बिहार दिनावर आधी वाद आणि नंतर समेट हे तर फिक्सिंग होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. फक्त राजकीय फायद्यासाठी मनसेनं हा वाद निर्माण केला होता असं सांगत हा वाद म्हणजे दोन दिवसांचा बिन पैशांचा तमाशा होता अशी बोचरी टीकाही राऊत यांनी मनसेवर केली आहे.
मुंबईत बिहार दिन साजरा केला जाईल. आम्हाला कोणीही अडवून शकत नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केले होते. त्यानंतर मालेगावात तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आज मुंबईत १५ एप्रिल रोजी मुंबईत साजरा करण्यात येणाऱ्या बिहारदिनाबाबत भूमिका ठरविण्यासाठी कृष्णकुंजवर मनसे आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती.
मात्र, बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बिहाराचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर राज यांनी बिहार दिनाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला. बिहार दिन हा राजकीय कार्यक्रम नसल्याने तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आपली काही हरकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.
First Published: Friday, April 13, 2012, 21:14