Last Updated: Wednesday, April 18, 2012, 09:36
www.24taas.com, मुंबई मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वेस्थानकाजवळच्या सिग्नल नियंत्रण केबीनला रात्री सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्यामुळे मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर रात्र काढावी लागली. दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरूस्त होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस उशिरा रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे.
आज बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून प्रवाशांना रेल्वे नसल्यामुळे ताटकळत बसावे लागले आहे. यामुळे मध्ये रेल्वेच्या मार्गावरील गाड्या 30 ते 40 मिनीटे उशीराने धावत आहेत. या मार्गावर आज दिवसभरात केवळ ७० टक्के गाड्या चालवल्या जाणार आहेत.
कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल नियंत्रण केबीनला आग लागल्याने मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर दादर ते कु्र्ला येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा मोठी गर्दी झाली होती. आगीचे वृत्त कळताच मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नियंत्रण केबिनमधील मीटरला शॉटसर्किटमुळे आग लागल्याचे मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियत्रंण मिळवण्यात यश आले.
मध्य रात्री बराचवेळ लोकल न आल्याने संतप्त प्रवाशांनी माटुंगा रेल्वे स्थानकावर लोकलवर दगडफेक केली. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या चारही मार्गावरील गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. तसेच हार्बर मार्गावरील गाड्याही वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. रात्री बाराच्या सुमाराच बंद पडलेली रेल्वे वाहतूक सुरु झाली तरी लोकल बरोबरच एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकही बिघडले आहे. तर सिंहगड(मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई) आणि प्रगती एक्स्प्रेस, मनमाड गोदावरी एक्स्प्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत.
व्हिडिओ पाहा...
First Published: Wednesday, April 18, 2012, 09:36