मुंबईत रेल्वे प्रवाशांचे हाल, एक्सप्रेस गाड्या रद्द - Marathi News 24taas.com

मुंबईत रेल्वे प्रवाशांचे हाल, एक्सप्रेस गाड्या रद्द

www.24taas.com, मुंबई
 
 
मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने  अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नल बिघाड दुरुस्तीला दोन ते तीन दिवस लागणार आहेत. सिग्नल बिघाडाचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रगती, सिंहगड, गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस  या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 
 
मध्य रेल्वेवरील कुर्ला ते विद्याविहार दरम्यान सिग्नल यंत्रणेच्या बिघाडामुळे त्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर झाला आहे. मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड गोदावरी एक्सप्रेस, आणि  लोकमान्य टिळक टर्मिनस -मनमाड राज्य राणी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 
 
मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वे  गाड्या नसल्याने अनेक प्रवाशांना चालत ऑफिस गाठावे लागले. तर  काही जण मध्येच अडकले आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनाने काहीही सोय न केल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गाड्या का उशिराने धावत आहेत तसेच का रद्द केल्या आहेत, याची माहिती न मिळाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे प्रवाशा संतप्त झाले आहेत.
 
 
 
मुंबईत मध्यरात्री रेल्वे प्रवाशांना स्टेशनवर ताटकळत बसावं लागलं. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान मध्य रेल्वेच्या सिग्नल रुमला आग लागल्याने रेल्वेची सेवा पूर्णतः ठप्प झाली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर अनेक प्रवाशांना स्टेशनवरच मुक्काम करावा लागला. रात्री साडेबारा ते पहाटे साडेचार पर्यंत मध्य सेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास आग आटोक्यात आणून सिग्नल सुरळीत करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या अर्धा ते एक तासाने उशीराने धावत आहेत. कुर्ल्यात ही घटना घडल्याने मध्य रेल्वेसह हार्बर लाईनची सेवाही विस्कळीत झाली आहे.
 
 
व्हिडिओ पाहा..
 

 

 
 

First Published: Wednesday, April 18, 2012, 09:35


comments powered by Disqus