'ट्रेन आजही लेट', चला घरातून लवकर निघा... - Marathi News 24taas.com

'ट्रेन आजही लेट', चला घरातून लवकर निघा...

www.24taas.com, मुंबई
 
मध्य रेल्वेने काल प्रवाशांचे अक्षरश: मेगा हाल केले. पण आजही मध्य रेल्वेच्या प्रवाशांना काहिसा असाचा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण की, रेल्वे सिग्नल यंत्रणेचे काम अजूनही युद्धपातळीवर सुरूच आहे. ते पूर्ण होण्यास काही अवधी नक्कीच लागणार आहे.
 
कालच्या हालबेहाल अनुभवानंतर मध्य रेल्वेची सेवा आज काहीशी रुळावर येऊ लागली आहे. काल पूर्णपणे ठप्प झालेल्या रेल्वेसेवेमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. आज सकाळपासून हळूहळू लोकल सुरू झाल्या आहेत. मात्र, ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याने चाकरमान्यांना घरातून लवकरच निघणं भाग आहे. सिग्नल दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या पीआरओंनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली आहे.
 
काल मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वेस्थानकाजवळच्या सिग्नल नियंत्रण केबीनला रात्री सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्यामुळे मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवाशांना प्रचंड त्रास झाला होता . दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरूस्त होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस उशिरा रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे.
 
आपण्यास काही अडचणी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा
 
आमचा टोल फ्री नंबर – 1800-22-1010
ई-मेल -zee24taasonline@gmail.com
 
 
 

First Published: Thursday, April 19, 2012, 07:59


comments powered by Disqus