Last Updated: Thursday, April 19, 2012, 23:30
www.24taas.com, मुंबई दुधात होत असलेल्या भेसळीचा पर्दाफाश झी 24 तासनं केल्यानंतर सरकारही आता या भेसळखोरांविरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलणार आहे. तर दुसरीकडं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव कमी मिळत असल्याचा प्रश्नाही ऐरणीवर आलाय. परंतु दुग्धविकास मंत्री मात्र याप्रकरणी गंभीर नसताना दिसत आहेत.
'सफेद दूध काळा धंदा' या माध्यमातून झी 24 तासनं दुधात होत असलेली भेसळ आणि त्यासाठी होणा-या रासायनिक पदार्थांच्या वापरामुळं आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम याचा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडला. केवळ बातमी देऊन जबाबदारी संपली असं आम्ही मानत नसल्यानं दूध भेसळखोरांची ही साखळी मोडून काढणंही आमचं कर्तव्य मानतो. त्यामुळंच आम्ही याचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित मंत्र्यांना गाठलं आणि त्यांनीही याप्रकरणी कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
दुधातील या भेसळीमुळं दूध उत्पादक शेतक-यांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. अगोदरच कमी भाव मिळत असल्यानं दूध उत्पादकांना वारंवार आंदोलनाचं हत्यार उपसावं लागत असताना दुग्धविकास मंत्री मात्र उडवाउडवीची उत्तर देण्यात मग्न आहेत. एकीकडं होत असलेली दूध भेसळ आणि दुसरीकडं राज्य सरकारची अनास्था. यात भरडला जातोय तो दूध उत्पादक शेतकरी आणि सामान्य ग्राहक. पण यातून मार्ग काढणं हे सर्वांच्याच हिताचं असणाराय आणि त्यासाठी झी 24 तास कटिबद्ध आहे.
First Published: Thursday, April 19, 2012, 23:30