बेस्ट पगार वाढ, वेतनश्रेणी करार मार्गी - Marathi News 24taas.com

बेस्ट पगार वाढ, वेतनश्रेणी करार मार्गी

www.24taas.com, मुंबई  
 
 
अक्षय्य तृतीयेचा दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांना खूष खबर देऊन गेला. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना घरघशीत अशी ५,००० रूपयांची पगार वाढ मिळाली आहे. परिवहन विभागातील एकूण ४० हजार कर्मचार्‍यांना वेतन कराराचा लाभ होणार आहे.
 
 
बेस्ट कर्मचार्‍यांचा गेल्या सहा वर्षांपासून रखडलेला सुधारित वेतनश्रेणी करार आज अखेर मार्गी लागला. वेतन करारापोटी बेस्टवर वर्षाला १२० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. या वेतन करारामुळे बेस्ट परिवहन उपक्रमातील बसचालक, बसवाहक आणि लिपिक यांच्या पगारात ४ ते ५ हजारांची घसघशीत वाढ होणार आहे. १ एप्रिलपासूनच वेतन करार लागू झाला असून येत्या पगारातच कर्मचार्‍यांना ही वाढ मिळणार आहे. परिवहन विभागातील एकूण ४० हजार कर्मचार्‍यांना वेतन कराराचा लाभ होणार आहे.
 
 
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन उद्योग आणि सामान्य प्रशासकीय विभागातील कर्मचार्‍यांचा गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या वेतन करारावर बेस्ट वर्कर्स युनियन आणि बेस्ट प्रशासनाने सह्या केल्यानंतर हा प्रस्ताव आज बेस्ट समितीत मंजुरीसाठी आला.  सुहास सामंत आणि सुनील गणाचार्य यांनी कनिष्ठ श्रेणी कामगारांना वेतन, महागाई भत्ता आणि हंगामी कामगार म्हणून काम करणार्‍या कामगारांच्या विधवांच्या वेतनाबाबत प्रशासनाला सूचना केल्या.
 
 
कर्मचार्‍यांचे वाढीव वेतन आणि थकबाकी भागविण्यासाठी पैसा उभा करावा लागणार आहे. एमईआरसीकडून मिळणारी वीजदरातील वाढ आणि बेस्ट भाडेवाढीतून ही रक्कम उभी करण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी म्हटले आहे.
 
 
काय आहे करार?
२००६ पासून रखडलेला हा करार मंजूर करण्यात आला.
१ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०१६ साठीचा हा दहा वर्षांचा करार आहे.
या करारामुळे कामगारांना पाच हजार वाढ मिळणार आहे.
याशिवाय त्यांना ३० टक्के घरभाडे आणि एक हजार रुपये वैद्यकीय भत्ता मिळणार आहे.
२००६ पासूनची ही वाढ असल्याने कर्मचार्‍यांना ६०० कोटी रुपयांची थकबाकी तीन हप्त्यांत देण्यात येणार आहे.
नवीन कर्मचार्‍यांचा पगार ३० ते ४० टक्के अधिक
महागाई भत्ता मूळ वेतनात जमा केला. त्यामुळे पगार वाढला.
वैद्यकीय भत्त्यात ५०० ते १००० रुपयांची वाढ
घरभाडे भत्त्यात ३० टक्के वाढ.
 
 

कोणाला किती पगार
बसचालक १२,८०० (आताचा), १७,७०० (वाढीनंतर)
बसवाहक १२५१३(आताचा) , १७४२९ (वाढीनंतर)
लिपिक १२,८०० (आताचा), १८,५००(वाढीनंतर)
नवघाणी ११,६००(आताचा), १५,४००(वाढीनंतर)
 
 
व्हिडिओ पाहा...
 

First Published: Wednesday, April 25, 2012, 12:17


comments powered by Disqus