अण्णांची भेट : राजनी स्वीकारली, बाळासाहेबांनी नाकारली - Marathi News 24taas.com

अण्णांची भेट : राजनी स्वीकारली, बाळासाहेबांनी नाकारली

www.24taas.com, मुंबई
 
 
सक्षम लोकायुक्तासाठी मुंबईत आलेल्या अण्णा हजारेंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भेट नाकारली आहे.  त्यामुळं अण्णा  आणि बाळासाहेबांच्या भेटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. बाळासाहेबांनी अण्णांना भेटीची वेळ दिलेली नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णांची भेट स्वीकारली. त्यामुळे भ्रष्ट्राचाराबाबत मनसे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
 
 
 
आपण आपल्या सोयीनुसार अण्णांची भेट घेणार असल्याचं बाळासाहेबांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळं आज भेट होणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे. तर उद्धव ठाकरेही औरंगाबादेत असल्यामुळं त्यांच्याही भेटीची शक्यता नाही. बाळासाहेब, शिवसेना आणि अण्णा यांच्यात म्हणावं तितकं सख्य नाहीये. जनलोकपाललाही शिवसेनेनं जाहीर विरोध केला होता. शिवाय शिवसेनेच्या मुखपत्रातून अण्णा आणि टीम अण्णांच्या सदस्यांवर सातत्यानं टीका केली जातेय. काही दिवसांपूर्वी झी 24 तासशी बोलतांना, टीम अण्णांच्या सदस्यांनी अण्णांना नाचवलं आणि नासवलं अशा शब्दात बाळासाहेबांनी अण्णांचा समाचार घेतला होता. त्यामुळे भेट होईल का नाही, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
 
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर अण्णा हजारे यांची बैठक सुरू आहे. या भेटीचे काय असणार आहे, फलित. भेटीनंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार का, याची उत्सुकता आहे. मनसेच्या भूमिकेनंतर शिवसेना काय भूमिका घेणार, याचीही चर्चा आहे. दरम्यान, काल अण्णा यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांची भेट घेतली होती. त्यांना अण्णांची भूमिका पडल्याचे आठवले यांनी सांगितले. आमचा अण्णांना पाठिंबा असल्याचे सांगितले.
 
 
 
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही अण्णांनी भेट घेऊन जनलोकपालबाबत चर्चा केली. यावेळी आपण दिल्लीशी बोलून लोकपालबाबत चर्चा करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी अण्णांना दिले. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र, शिवसेनेचे कार्याध्यक्ष  उद्धव ठाकरे हे औरंगाबादला असल्याने त्यांच्या भेटीची माहिती मिळू शकलेली नाही. सुरूवातीपासून सेनेने अण्णांच्या आंदोलनाची टर उडविली आहे. त्यातच बाळासाहेबांनी भेट नाकारल्याने सेनेचा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे.

First Published: Thursday, April 26, 2012, 14:25


comments powered by Disqus