Last Updated: Thursday, April 26, 2012, 23:01
www.24taas.com, मुंबई महागाईच्या भडक्यात आता मुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळली. बेस्ट कमिटीमध्ये भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर मनपा सभागृहातही भाडेवाढीला मंजुरी मिळालीय. गुरुवारच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
रेल्वे, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर मुंबईची लाईफलाइन बेस्टनंही भाडेवाढ केली आहे. बेस्टनं ही भाडेवाढ 1 रुपयापासून 16 रुपयांपर्यंत केली आहे. आता 2 किलोमीटरसाठी किमान भाडं 4 रुपयांऐवजी 5 रुपये असणार आहे. तीन किलोमीटरसाठी 6 रुपयांऐवजी 7 रुपये मोजावे लागणार आहेत. 5 किलोमीटरसाठी तीन रुपयांची भाडेवाढ झाली असून तिकिटाचा दर 10 रुपये असेल. 7 किलोमीटरचं भाडं 4 रुपयांनी वाढून 12 रुपये झालंय. 10 किलोमीटरसाठी 15 रुपये तर 15 किलोमीटरसाठी 12 रुपयांवरून 18 रुपये म्हणजेच सहा रुपयांची भाडेवाढ झाली आहे.
शिवसेना भाजप युतीने बेस्ट भाडेवाढीचं समर्थन केलंय. तर समाजवादी, काँग्रेस, राष्ट्रवादीनं भाडेवाढीला विरोध केलाय. भाडेवाढीला विरोध करण्यासाठी विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. बेस्टनं तिकिटांच्या भाडेवाढीबरोबरच मासिक स्मार्ट कार्डमध्येही वाढ केली आहे. 550 रुपयांचा मासिक पास 750 रुपये करण्यात आलाय. एक्सप्रेस मासिक पास 800 रुपयेवरुन 1000 रुपये झालाय. तर एसी डायमंड मासिक पास 1500 रुपयांवरुन 2000 रुपये झालाय. पालिका निवडणुकीनंतर शिवसेना- भाजप युतीनं महागाईच्या भडक्यात भाडेवाढ लागू केल्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
First Published: Thursday, April 26, 2012, 23:01