राष्ट्रवादीला शह देण्यासाठी राहुल दौरा - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादीला शह देण्यासाठी राहुल दौरा


www.24taas.com, मुंबई
 
 
साता-यातला दुष्काळी भागातला दौरा राहुल गांधींनी अवघ्या अडीच तासांत आटोपलाय. फक्त आश्वासन देऊन राहुल गांधींनी ग्रामस्थांची बोळवण केलीय. महत्त्वाचा प्रश्न हा की राहुल गांधींना महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या व्यथा कळल्या का.... दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी या भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, नंतर शरद पवारांनीही या भागाचा दौरा केला. त्यानंतर आता राहुल गांधींनी याच भागाचा दौरा केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा एकमेकांना शह देण्याचा प्रकार सुरू आहे.
 
 

पंचवीस वर्षांपूर्वी राजीव गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी सोनियांसमवेत याच माण तालुक्याला भेट दिली होती.१९८५साली राजीव गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी सोनियांसमवेत माण तालुक्यातील मार्डीगावाला भेट दिली होती. १९ ऑक्टोबर २००३ ला सोनिया गांधींनी या दुष्काळी भागाचा दौरा केला होता.  आता पंचवीस वर्षांनंतर राहुल गांधींनी त्याच गावाला भेट दिलीय.
 
 
पंचवीस वर्षांनंतरही या गावातली दुष्काळी परिस्थितीही कायम आहे, ग्रामस्थांच्या व्यथा कायम आहेत. त्यामुळे काँग्रेसनं गेल्या पंचवीस वर्षांत काय केलं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  विशेष म्हणजे गांधी परिवारातील दिग्गज नेते या भागात येऊनही इथल्या परिस्थीतीत काडीमात्र सुधार झालेला नाही. त्यामुळे नेतेमंडळींचे हे दौरे फक्त प्रसिद्धीपुरताच आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे.
 
 
राहुल गांधींनी आज दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला खरा मात्र या दौ-यात कोणतही ठोस आश्वासन त्यांनी दुष्काळग्रस्तांना दिलं नाही. या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन देऊन त्यांनी दुष्काळग्रस्तांची बोळवण केली. राज्यात  आणि केंद्रात आपली सत्ता असल्यानं दुष्काळी भागातले प्रश्न सोडवण्याठी प्रयत्न करू असं राहुल गांधींनी म्हंटलय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळत दुष्काळग्रस्तांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे.
 
 

राहुल गांधी यांच्या दौ-यामुळं दुष्काळग्रस्त भागाचा कायापालट होण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक आमदार जयकुमार मोरे यांनी व्यक्त केलाय. तर कायम दुष्काळग्रस्त असलेल्या भागासाठी वेगळा निकष लावून उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली दरम्यान राहुल गांधींच्या दौ-यातून जनतेला काय मिळणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारण्यात येत आहे. दौरे करण्यापेक्षा उपाययोजना करा, अशी अपेक्षा राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

First Published: Saturday, April 28, 2012, 13:40


comments powered by Disqus